सुपर स्पेशालिटीसह इर्विनची पालकमंत्र्यांद्वारे पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:00 AM2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:02+5:30
आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येत असून, सुपर स्पेशालिटीमध्ये १०० बेडचे सुसज्ज विलगीकरण कक्ष कार्यान्वित केले आहे. कोरोना हा अतिशय संसर्गजन्य विषाणू आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव हा गर्दीतून तात्काळ होतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. घराबाहेर पडू नये. या पंधरवड्यात जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. जिल्ह्यात तूर्तास एकही रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आलेला नाही. तथापि, सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह विविध ठिकाणी व्हेंटिलेटरसह सुसज्ज कक्ष कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिली.
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आवारातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षाची व जिल्हा स्त्री रुग्णालयाची पालकमंत्र्यांनी सोमवारी पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकमसह इतर फॅकल्टी डॉक्टर, विशेष कार्य अधिकारी रणजित भोसले उपस्थित होते.
आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येत असून, सुपर स्पेशालिटीमध्ये १०० बेडचे सुसज्ज विलगीकरण कक्ष कार्यान्वित केले आहे. कोरोना हा अतिशय संसर्गजन्य विषाणू आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव हा गर्दीतून तात्काळ होतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. घराबाहेर पडू नये. या पंधरवड्यात जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. विषाणूचा प्रादुर्भाव हा १४ दिवसांपर्यंत असतो. त्यामुळे सर्वांनी लॉकडाऊनच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
स्थलांतरित व्यक्तीच्या भोजनाची व्यवस्था
परराज्यातील व जिल्ह्याबाहेरील नागरिकांकडून होणाऱ्या स्थलांतराच्या परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. ज्या तालुक्याच्या ठिकाणी कारागीर, मजुरांचे स्थलांतर आढळून येत आहे, त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून तहसीलदारांंच्या नेतृत्वात स्थलांतरितांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.