‘इर्विन’चे वाॅर्ड हाऊसफुल्ल; रुग्णांवर व्हरांड्यात उपचार

By उज्वल भालेकर | Published: May 6, 2023 06:03 PM2023-05-06T18:03:26+5:302023-05-06T18:04:07+5:30

Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील सर्जरी तथा अस्थिरोगाशी संबंधित असेलेले वाॅर्ड हाऊसफुल्ल झाल्याने काही रुग्णांवर व्हरांड्यातच खाली गादीवर उपचार केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Irwin's Ward Housefull; Treatment of patients in the verandah | ‘इर्विन’चे वाॅर्ड हाऊसफुल्ल; रुग्णांवर व्हरांड्यात उपचार

‘इर्विन’चे वाॅर्ड हाऊसफुल्ल; रुग्णांवर व्हरांड्यात उपचार

googlenewsNext

उज्वल भालेकर 
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील सर्जरी तथा अस्थिरोगाशी संबंधित असेलेले वाॅर्ड हाऊसफुल्ल झाल्याने काही रुग्णांवर व्हरांड्यातच खाली गादीवर उपचार केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरही तपासणी न करताच नागपूरला रेफर करत असल्याचा आरोप काही रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. रुग्णालयात बेडच उपलब्ध नसल्याने आरोग्य प्रशासनही हतबल असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) हे जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय रुग्णालयांसाठीचे रेफर सेंटर आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी याच रुग्णालयात दाखल केले जाते. परंतु, रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांना कशी योग्य आरोग्य सेवा पुरवावी, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनापुढे आहे. अपघातग्रस्त (अस्थिरोग) रुग्णांसाठी असलेले वाॅर्ड क्र. १२ मध्ये एकूण १८ बेडची सुविधा आहे, परंतु, याठिकाणी ३६ रुग्ण उपचारासाठी दाखल असल्याने काही रुग्णांवर व्हरांड्यात उपचार सुरू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच शस्त्रक्रिया व अस्थिरोगसाठी असलेले वाॅर्ड क्र. १३, १४, १५ देखील हाऊसफुल्ल असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे अशा या गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 

एका शिफ्टला एकच परिचारिका
प्रत्येक वाॅर्डामध्ये एका शिफ्टमध्ये एकच परिचारिका कर्तव्य बजावत असून, तिलाच सर्वच जबाबदारी पार पाडावी लागते. साधारणता सात रुग्णांमागे एक परिचारिका असणे गरजेचे आहे. परंतु, रुग्णालयातील परिचारिकांची अनेक पदे रिक्त असल्याने एका परिचारिकेला वाॅर्डात भरती असलेल्या सर्वच रुग्णांची नोंद ठेवणे, त्यांना वेळोवेळी औषधोपचार करणे, सलाईन लावणे, रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविणे ही सर्व कामे करावी लागतात. वाॅर्ड क्र. १२ मध्ये भरती असलेल्या ३६ रुग्णांची जबाबदारी ही एका परिचारिकेलाच सांभाळावी लागत आहे.

अशी आहे रुग्णालयातील रुग्ण संख्या

जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातग्रस्त तसेच अस्थिरोगाशी संबंधित रुग्णांसाठी एकूण ५ वाॅर्ड आहेत. शनिवारी वाॅर्ड क्र. १२ मध्ये क्षमता १८ रुग्णांची असून ३६ रुग्ण दाखल, १३ मध्ये २१ बेडची क्षमता असून भरती रुग्ण २४, वाॅर्ड. क्र १४ मध्ये १६ ची क्षमता असून भरती रुग्ण २६, वाॅर्ड क्र. १५ मध्ये ३० बेडची क्षमता असून ३० रुग्ण दाखल आहेत, तर वाॅर्ड क्र. १६ मध्ये मात्र बेड रिकामे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

वर्षाभरापूर्वी पाठविला ७०० बेडचा प्रस्ताव
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या तुलनेत बेडची संख्या कमी आहे. त्यामुळे रुग्णालयाची क्षमता ही सातशे बेडची करण्यात यावी, असा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. प्रस्ताव पाठवून एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे, मात्र अजूनही हा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला नाही.

 

रुग्णालयात भरती झालेल्या सर्वच रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम रुग्णालयातील डॉक्टर करतात. परंतु, बेडची संख्या कमी असल्याने काही रुग्णांना खाली गादीवर झोपावे लागत आहे. बेड वाढविण्याची मागणी केली आहे.
डॉ. नरेंद्र सोळंके, आरएमओ, इर्विन

Web Title: Irwin's Ward Housefull; Treatment of patients in the verandah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.