जिल्हा पुरवठा विभागाला ‘आयएसओ’ मानांकन; विविध मानकांची केली आहे पूर्तता
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 4, 2024 12:27 AM2024-05-04T00:27:27+5:302024-05-04T00:27:55+5:30
विविध प्रकारच्या ६० निकषांची पूर्तता झाल्याने या विभागाला आता ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले. अशा पद्धतीचे मानांकन मिळविणारे डीएसओ कार्यालय हा जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिलाच विभाग ठरला आहे.
अमरावती : शासकीय कार्यालयात काम म्हटले सामान्य नागरिकांच्या माथ्यावर आठ्या पडतात. हा सूर मात्र, जिल्हा पुरवठा विभागात आता बदलल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या ६० निकषांची पूर्तता झाल्याने या विभागाला आता ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले. अशा पद्धतीचे मानांकन मिळविणारे डीएसओ कार्यालय हा जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिलाच विभाग ठरला आहे.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात अधिकारी-कर्मचारी यांच्या कामाच्या दर्जामध्ये वाढ करण्यासाठी व कामांचे प्रमाणीकरण, प्रशासनात अधिक पारदर्शकता, लोकाभिमुखता व संवेदनशीलता आणणे, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांच्याद्वारा ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणीकरण करण्यात येते. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पुरवठा विभागात एक मानांकित गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली व त्याद्वारे जिल्हा पुरवठा कार्यालयाचे आयएसओ प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे.
कार्यालयाशी निगडित सर्व कामे वेळेत पूर्ण करणे, विभागाशी संबंधित सर्व कार्यालये व संबंधित संस्थांना लोकाभिमुख सेवा देताना सकारात्मक भूमिका राहणे, कार्यपद्धतीत पारदर्शकता ठेवणे यासह मुद्दे मानांकनासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
१० विषयाअंतर्गत ६० निकष पूर्ण
आयएसओ मानांकनासाठी १० विषयाअंतर्गत ६० निकष देण्यात आलेले आहे. हे सर्व क्लिष्ट निकष जिल्हा पुरवठा विभागाद्वारा पूर्ण करण्यात आलेले आहेत. यामध्ये संसाधन गरजा, दस्तावेज व अभिलेख, नोटीस बोर्ट, सिटीजन चार्टर बोर्ड, संगणक प्रणाली, ग्राहक अभिप्राय व उपलब्ध सेवांचे मूल्यमापन, गुणवत्ता प्रणाली, सुरक्षा, प्रशिक्षण व इतर असे विषयांच्या अनुषंगाने निकषाची पूर्तता करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाअंतर्गत पुरवठा विभागाला ‘आयएसओ’ मानांकन मिळणे हे मोठे यश आहे. इतर विभागालादेखील यामुळे प्रोत्साहन मिळेल व यासाठी प्रयत्न केल्या जातील. याद्वारे प्रशासकीय कामकाजामध्ये मोठी सुधारणा होईल.
- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी