अमरावती जिल्ह्यातील पापळ प्राथमिक आरोग्य केंद्राला आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:53 AM2018-06-15T10:53:33+5:302018-06-15T10:53:42+5:30
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट आरोग्य सेवेमुळे आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट आरोग्य सेवेमुळे आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे.
पापळ येथील आरोग्य केंद्र १९८४ ला स्थापन झाले. ४ जानेवारी १९८८ ला इमारतीचे बांधकाम करण्यात आले. ३० वर्षे जुनी इमारत असली तरी स्वच्छ व सुंदर परिसर आणि दर्जेदार आरोग्य सेवेमुळे आरोग्य केंद्राला सन २०१०-११ व सन २०१३-१४ मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार दोनवेळा प्राप्त झाला आहे. राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार सन २०१६-१७ व सन २०१७-१८ करिता सलग पटकावला आहे. संस्थात्मक प्रसूती व राष्ट्रीय कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेमध्ये मागील चार वर्षांपासून अमरावती जिल्ह्यात प्रथम पुरस्कार मिळतो आहे. तालुक्यामधील शासकीय संस्थांमधून फक्त पापळलाच हे मानांकन मिळाल्याबद्दल रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जि.प. सदस्य अनिता अडमाते, नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले तसेच गावकऱ्यांच्यावतीने येथील सरपंच विजय अजबले यांनी वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
या मानांकनाकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. मुरादे, डॉ. अभिषेक नायडू तसेच सुधीर बाळापुरे, निर्मला लकडे, खांडेकर, अडमाते, विशाल राठोड, अमोल ढेरे, केंद्रे, गायकवाड, ठाकरे, गोरले, गौरखेडे, डाहाळे, गेडेकार, हतनापुरे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सर्व कर्मचाऱ्यांची सांघिक मेहनत व सहकार्य तसेच जनतेस देण्यात आलेल्या दर्जेदार आरोग्यसेवेमुळेच आयएसओ मानांकन मिळाले. यापुढेसुद्धा आरोग्य केंद्राची सेवा अशीच दर्जेदार राखण्याकरिता सर्व कर्मचारी प्रयत्न करतील.
- डॉ. डी.एस. मुरादे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पापळ