नाना-नानी पार्कचा मुद्दा सभागृहात तापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:16 PM2018-11-20T22:16:26+5:302018-11-20T22:17:07+5:30
क्रांती कॉलनीऐवजी सातुर्णामध्ये बांधण्यात आलेल्या नाना-नानी पार्कवर महिनाभरात काय कारवाई केली? कारवाई झाली नसल्याने हा सभागृहाचा अपमान नव्हे काय, याबाबत सभागृहाची माफी मागा, असे प्रश्न उपस्थित करीत तुषार भारतीय यांनी मंगळवारच्या आमसभेत वातावरण तापविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : क्रांती कॉलनीऐवजी सातुर्णामध्ये बांधण्यात आलेल्या नाना-नानी पार्कवर महिनाभरात काय कारवाई केली? कारवाई झाली नसल्याने हा सभागृहाचा अपमान नव्हे काय, याबाबत सभागृहाची माफी मागा, असे प्रश्न उपस्थित करीत तुषार भारतीय यांनी मंगळवारच्या आमसभेत वातावरण तापविले. आमदार रवि राणा विरुद्ध भाजपा हा संघर्ष काही दिवसांपासून महानगरात सुरू असताना याचे पडसाद मंगळवारच्या आमसभेतही उमटले.
यापूर्वी १६ तारखेच्या बैठकीत आठ दिवसांत कारवाई करण्यात येईल, असा निर्णय सभापतींनी तुषार भारतीय यांच्या समक्ष दिला होता. हाच मुद्दा रेटत भारतीय यांनी आयुक्तांची कोंडी केली. सभापतींचा निर्णय असताना अतिक्रमण काढण्याबाबत सभापती व सभागृहाचा अपमान झाल्याने मंगळवारच्या सभेत या ठिकाणी काय कारवाई केली, याबाबत स्पष्ट करावे, अशी मागणी भारतीय यांनी केली. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा केलेली नाही. १६ तारखेनंतर पत्र देण्यात आलेले नाही. याविषयीचे कार्यारंभ आदेश रद्द करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात येतील. याबाबत बांधकाम विभागाशी वैयक्तिक बैठक घेऊन मुद्दा स्पष्ट करू, असे महापालिका आयुक्त संजय निपाने यांनी सभागृहाला सांगितले.
या नान-नानी पार्कला महापालिकेने एनओसी दिली काय, अशी विचारणा विलास इंगोले व प्रशांत वानखडे यांनी केली. याच मुद्यावर अजय गोंडाणे यांनीदेखील विचारणा केली. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन शहरातील सर्व नाना- नानी पार्क येत्या १५ दिवसांत तपासून नियमानुसार कारवार्ई करण्यात येईल, असे आश्वासन सभापती संजय नरवणे यांनी दिले. फायबर टॉयलेटच्या ठिकाणी नियोजित नाल्यांचे बांधकाम झालेले नसताना याची देयके कशी देण्यात आलीत? यामध्ये पाणी कोठे मुरले याबाबतचा प्रश्न धीरज हिवसे यांनी विचारला होता. हायड्रॉलिक आॅटो खरेदीमध्ये २०१२-१३ तसेच २०१५-१६ मध्ये एकाच कंपनीचे आटो असताना किमतीमध्ये तफावत का, अशी विचारणा धीरज हिवसे यांनी केली. या प्रश्नावर चर्चा करू, असे सभापतींनी सांगितले. प्रभाग क्रमांक सहा मधील संत गुलाब बाबा नगरातील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न सोनाली करेसीया यांनी उपस्थित केला. आमसभेच्या सुरूवातीला कोरमअभावी सभा १० मिनिटे स्थगित करण्यात आली. नंतर उशिरापर्यंत शहरासाठी मंजूर प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू होती.
वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याच्या नियुक्तीस मान्यता
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदावर केलेल्या नियुक्तीस मान्यता देण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडून आला असता सभागृहाने मंजूरी दिली. तत्पूर्वी विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, चेतन पवार, प्रशांत वानखडे यांनी याबाबत सभागृहात मत व्यक्त केले. विरोधी पक्ष नेता बबलू शेखावत यांना डेंग्यू झाल्याचे निदान सोमवारी सायंकाळी रक्त चाचणी अहवालाअंती स्पष्ट झाल्याचे विलास इंगोले यांनी सभागृहात सांगितले. यावेळी शहर स्वच्छता विषयक मते सदस्यांनी मांडली.
शहर बस वाहतूक वाढीव दरास मान्यता
वेळेवर आलेल्या विषयांत शहर बस वाहतूक भाड्याचे दर वाढविण्याबाबतचा प्रस्ताव आला असता हे दर ५३ रूपये डिझेलचे दर असतानाचे आहेत. आता ८० रूपये दर झाले असल्याचे भाववाढीस मान्यता देण्यात आली. राजापेठ येथील भुयारी मार्ग प्रकल्पा करीता २.७० टक्के वाढीव कामास मंजूरी देण्यात आली. मात्र, महालिकेचे काम असताना श्रेयवाद व उद्घाटनाच्या कार्यक्रमात होत असलेल्या प्रकाराबाबत काही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जनरल मिटींगमध्ये या बाबीची चर्चा व्हायला पाहिजे, असे मत सदस्यांनी व्यक्त केले.