पशुसंवर्धन समितीत गाजला असहकार आंदोलनाचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:16 AM2021-08-14T04:16:39+5:302021-08-14T04:16:39+5:30
अमरावती : काही दिवसांपूर्वी पशुधन पर्यवेक्षक व पशुविकास अधिकाऱ्यांनी जवळपास एक महिना असहकार आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे पशुधनावरील ...
अमरावती : काही दिवसांपूर्वी पशुधन पर्यवेक्षक व पशुविकास अधिकाऱ्यांनी जवळपास एक महिना असहकार आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे पशुधनावरील उपचार व लसीकरणात अडथळा निर्माण झाला होता. यामुळे या अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने कोणती कारवाई केली, असा प्रश्न समिती सदस्यांनी उपस्थित करत यावर अधिकाऱ्यांना जाब विचारला.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विषय समितीची सभा विविध विषयाला अनुसरून १२ ऑगस्ट रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी सभापती विठ्ठल चव्हाण, सदस्य शरद मोहोड, दिनेश टेकाम, सुखदेव पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे यांच्यासह अन्य उपस्थित होते. गत महिनाभर जिल्हाभरात पशुसंवर्धन विभागाचे पशुधन पर्यवेक्षक व पशुविकास अधिकारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील पशुधन उपचारावर बसला. काही पशुधन दगावल्याच्या घटनाही घडल्या. लसीकरणाचे कामही विस्कळीत झाले होते. त्यामुळे या अधिकाऱ्यावर प्रशासनाने कोणती कारवाई केली, असा प्रश्न सदस्य शरद मोहोड, दिनेश टेकाम आदींनी उपस्थित करीत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळल्याने सदस्य आक्रमक झाले होते. अखेर याबाबत संबंधिताकडून अहवाल मागवून कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिले. याशिवाय सभेत अन्य विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.