रेल्वेचा मुद्दा कुपोषणावर भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:00 AM2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:01:43+5:30
पूर्णा ते अकोला आणि अकोला ते अकोट या नॅरोमीटर गेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले असून, त्यावर पूर्ण भार असणारी रेल्वे लाईन तपासणीसुद्धा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच करून घेतली आहे. परंतु आकोट ते खंडवा दरम्यानची रेल्वेलाईन व्याघ्र प्रकल्पाच्या ३५ किलोमीटर जंगलामुळे आणि त्यातही ते २३ किलोमीटर अति संरक्षित जंगलाच्या आत गेल्याने वादात अडकली आहे.
श्यामकांत पाण्डेय ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटात सध्या पावसाळ्याच्या दिवसांत रेल्वे लाईनचा प्रश्न अन्य सर्व मुद्यांना झाकोळणारा ठरला आहे. मेळघाटात कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यासारखे महत्त्वाचे मुद्दे सध्या बाजूला सारले गेले आहेत. अकोट ते खंडवा जाणारी ब्रॉडगेज रेल्वे वाहतूक मार्ग हा एकमेव विषय राजकारणात पुढे असल्याचे चित्र आहे.
अकोला ते खंडवा मीटर गेज लाईन चार वर्षांपासून ब्रॉड गेजच्या विस्तारीकरणासाठी प्रलंबित आहे. पूर्णा ते अकोला आणि अकोला ते अकोट या नॅरोमीटर गेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले असून, त्यावर पूर्ण भार असणारी रेल्वे लाईन तपासणीसुद्धा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच करून घेतली आहे. परंतु आकोट ते खंडवा दरम्यानची रेल्वेलाईन व्याघ्र प्रकल्पाच्या ३५ किलोमीटर जंगलामुळे आणि त्यातही ते २३ किलोमीटर अति संरक्षित जंगलाच्या आत गेल्याने वादात अडकली आहे. नेमक्या या भागातून विस्तारित मोठी रेल्वे लाईन हिवरखेड जामोदमार्गे परिवर्तीत करण्याचे प्रस्तावित आहे. हिवरखेड ते तुकाईथड हा मार्ग परिवर्तीत मार्गावर गेल्यास मेळघाटातील जनता रेल्वे लाईनपासून आणि त्याच्या सुविधेपासून पूर्णपणे वंचित राहणार आहे. त्यामुळे पूर्ववत टाकण्यात आलेल्या मीटरगेजचे रुपांतरण ब्रॉडगेजमध्ये करण्यात यावे, याकरिता मेळघाटवासीयांची जनजागृती तत्कालीन भाजपा तालुकाध्यक्ष आप्पा पाटील यांनी केली. त्यानंतर या प्रकरणात माजी आमदार प्रभूदास भिलावेकर आणि माजी उपायुक्त रमेश मावस्कर यांनी उडी घेतली. सर्वांचे दौरे प्रभावित रेल्वेमार्गावरील गावांच्या नागरिकांशी संवाद साधण्यात व्यस्त आहेत. मात्र त्यात राजकारणही शिरले आहे. त्यात शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसुळ यांनी उडी घेतली आहे.
सर्व गावे राणीगाव सर्कलमध्ये
ज्या भागातून जुनी लाईन जात होती, त्या मार्गावरील सर्व गावे ही राणीगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये येतात. राणीगाव सर्कलमध्ये राण्ीगाव आणि सावलीखेडा असे दोन पंचायत समिती मतदारसंघात येतात. या दोन्ही पंचायत समिती तसेच राणीगाव जिल्हा परिषद सर्कलवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे गेंदालाल मावस्कर आणि त्यांच्यानंतर सुधीर सूर्यवंशी यांनी प्रतिनिधित्व केले. हा गण आता ओबीसी वर्गाकरिता राखीव असणार असल्यामुळे यावर अनेकांचा डोळा लागलेला आहे. त्यामुळेही राजकारणाने वेग घेतला आहे.
माजी खासदारांचे फेसबुक लाईव्ह
जिल्ह्याचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर अकोट खंडवा रेल्वे लाईनबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मेळघाटवासीयांना रेल्वे सुविधांपासून वंचित ठेवणार नाही आणि प्रस्तावित ब्रॉडगेज मेळघाटातूनच जाईल, असा निर्धार बोलून दाखविला. त्यामुळे माजी खासदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यात परस्परविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की आनंदराव अडसूळ शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा नवा वादसुद्धा निर्माण झालेला आहे. या सर्व प्रकरणात पुढे काय घडते, याकडे त्यांचे लक्ष लागले आहेत.
म्हणून आला प्रस्ताव
व्याघ्रप्रकल्पातील अति संरक्षित जंगलामुळे वाघांचे व वन्य प्राण्यांचे वास्तव्यात धोका निर्माण होईल या उद्देशाने गैर शासकीय संघटनेमार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मेळघाटातून जाणाºया रेल्वे लाईनचे काम तूर्तास थांबविण्यात आले. जळगाव जामोद वरून परिवर्तित रेल्वेमार्गाचा नवीन प्रस्ताव आहे. या प्रस्तावामुळे मेळघाट वासियांना रेल्वेपासून वंचित राहावे लागणार आहे
आघाडी सरकारविरुद्ध रोष
जंगल संवर्धनाला महत्त्व देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच हिवरखेड ते खंडवा हे मार्ग जंगल वगळता परिवर्तीत मार्गावरुन जाण्यास मान्यता दिली. तेव्हापासून मेळघाटातील जनतेत आघाडी सरकारविरुद्ध असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.