ठाणेदार मनीष ठाकरेंच्या निलंबनाचा मुद्दा तापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:26 AM2018-07-20T01:26:01+5:302018-07-20T01:26:48+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठीचे पिलर तोडण्यास कारणीभूत असणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना निलंबित करण्याच्या मागणीच्या आंदोलनाची दुसऱ्या दिवशी, गुरुवारी तीव्रता वाढली. लहुजी शक्ती सेना, भीम आर्मी यांच्यासह ...
पोलीस आयुक्तांना सत्तापक्षाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठीचे पिलर तोडण्यास कारणीभूत असणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना निलंबित करण्याच्या मागणीच्या आंदोलनाची दुसऱ्या दिवशी, गुरुवारी तीव्रता वाढली. लहुजी शक्ती सेना, भीम आर्मी यांच्यासह सत्तापक्षातील भाजप अनुसूचित जाती मोर्चानेही मैदानात दंड थोपटल्याने या मुद्द्याची व्यापकता आणि गांभीर्य आता वाढले आहे.
अत्यंत वर्दळीच्या गर्ल्स हायस्कूल चौकात ठाणेदाराच्या निलंबनासाठी दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलन स्थळानजीक तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त इतका तगडा आहे की, तो बघून सामान्यांच्या मनात धडकी भरू लागली आहे. नियमितपणे तेथून ये-जा करणाºया काही शाळकरी मुलांच्या मातांनी दुचाकीचा मार्गच बदलविला आहे. दंगा नियंत्रण पथक, पोलीस लॉरी, सीआर मोबाइल आणि पोलीस जीपच्या रांगा, पोलीस अधिकारी, पोलिसांचा तंबू, असे सामान्यांना भयचकित करणारे चित्र तेथे दिवसरात्र दिसते.
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी लोकशाहिरांच्या अनुयायांवर दबाव निर्माण करण्यासाठी 'खाकी'चा वापर सुरू केल्याची भावना या बंदोबस्तामुळे आंदोलकांमध्ये निर्माण झाल्याने एकूच तीव्रता वाढली आहे. सत्तापक्षाने गुरुवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मागणी पूर्ण न केल्यास मुख्यमंत्र्यांकडे दाद मागू,असा इशाराच देऊन टाकला. लोकशाहिरांच्या अनुयायांची संख्या जिल्ह्यात अडीच लक्ष असल्याचे गणित असल्यामुळे इतर राजकीय पक्षांनीही आता या प्रकरणाकडे लक्ष केंद्रित केले आहे
अन्यथा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊ
सामाजिक भावना दुखावणारे व महापुरुषांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची तोडफोड करण्यास कारणीभूत असणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी बुधवारी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे करण्यात आली. लहुजी शक्ती सेनेने छेडलेल्या आंदोलनाला भाजप अनुसूचित जाती मोर्चाने समर्थन देत आपली मागणी बुलंद केली. या विषयावर लक्ष देऊन कारवाई करावी, अन्यथा हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल, असा इशारा भाजप अनुसूचित जाती मोर्चाने पोलीस आयुक्तांना दिला आहे. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहर जिल्हाचे अध्यक्ष सुधीर थोरात, मुकुं द खंडारे, प्रल्हाद अंभारे, अनिल सोनटक्के, लक्ष्मण सरकटे, प्रमोद खडसे, संदीप कंधारे, रतन खंडारे, देवानंद चांदणे, विनोद थोरात, आकाश खडसे, अल्केश वानखडे, गजानन खडसे, अरुण कामनेकर, पवन राजूरकर, संजय खडसे, सचिन नाईक, सुनील थोरात आदी उपस्थित होते.