आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार; आमदार रोहित पवार
By उज्वल भालेकर | Published: December 4, 2023 08:33 PM2023-12-04T20:33:55+5:302023-12-04T20:34:21+5:30
संघर्ष यात्रेला अमरावती जिल्ह्यात युवकांचा प्रतिसाद
अमरावती : संघर्ष यात्रेतून आरोग्य, शिक्षण, बेरोजगार युवकांचे अनेक प्रश्न समोर येत आहेत. अमरावतीमध्येही दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. परंतु तरीही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. अनेक रुग्णालयांमध्ये औषधी नाही, शाळेत शिक्षक नसल्याची परिस्थिती आहे. हे सर्व प्रश्न नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पत्र परिषदेत दिली.
जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. रविवार ३ नोव्हेंबरला ही यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. त्याअनुषंगाने रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, या संघर्ष यात्रेमध्ये जे प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून येत आहेत, ते सर्व प्रश्न अधिवेशनात मांडणार आहे. सरकारने जारी केलेल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या यादीतून अमरावती जिल्ह्यासह अनेक जिल्हे वगळण्यात आले आहेत.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने पहिली ४० तालुक्यांची यादी पाठवली पण, दुसरी ९०-१०० तालुक्यांची यादी अद्याप केंद्र सरकारकडे पाठवली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अजूनही येथील नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एकदाही अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली नाही त्यामुळेच जिल्हा मदतीपासून वगळण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. या पत्र परिषदेला स्वर्गीय उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील तसेच स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणूक आल्यावर घड्याळ कोणाकडे हे स्पष्ट होईल
भाजपसोबत जाण्याचा निर्णय जर शरद पवार साहेबांचा असता तर आज ते विरोधात नसते. त्यामुळे अजित दादा काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवाराच आहेत. आणि चिन्हासाठीची न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. त्यामुळे निवडणूक काळात घड्याळ कोणाकडे आहे हे दिसून येईल. निवडणूक अयोगाला एकतर्फी निर्णय देता येणार नाही. आता फक्त अजित पवार मित्र मंडळ असल्याचा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला.
नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयात कालबाह्य औषधी
नांदगाव खंडेश्वर येथे संघर्ष यात्रेदरम्यान येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था पाहण्याचा आग्रह स्थानिक नागरिकांनी केला. त्यामुळे या रुग्णालयाला भेट दिली असता, येथे कालबाह्य औषधी असल्याचे दिसून आले. तसेच इतर काही महत्वाच्या औषधांचा तुटवडा असल्याचेही दिसून आले. काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात एका लहान मुलाचा मृत्यू देखील झाला होता. त्यामुळे यासंदर्भात तेथील डॉक्टरांशी चर्चा करून त्यांचे अडचणी समजून घेत ते अधिवेशनात मांडणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.