ऑनलाईन जाॅबच्या नादात १४ लाख गमावले, वरूडच्या आयटी तरुणाला गंडा
By प्रदीप भाकरे | Published: June 2, 2023 04:39 PM2023-06-02T16:39:33+5:302023-06-02T16:39:58+5:30
टास्क पूर्ण करण्याचे टार्गेट : मोठी रक्कम देण्यास केले प्रवृत्त
अमरावती : पार्ट टाईम जॉब करुन प्रतिदिन अडीच ते तीन हजार रुपये कमवा अशा जाहिरातीला बेरोजगार फसवत असून अनेक जण या मोहात अडकून आपले लाखो रुपये गमवत असल्याचे दिसून येत आहे. सायबर चोरट्यांच्या या नव्या फंड्यात अनेक जण अडकत आहे. वरूड येथील एक आयटीयन देखील या सापळ्यात अडकला आणि १४ लाख २४ हजार रुपये गमावून बसला आहे.
वरूड येथील सचिन गव्हाणे (४४, जैन मंदिर रोड) या आयटी फ्री लान्सर व्यक्तीच्या बॅंक खात्यातून सायबर भामटयांनी ६ ते ७ मार्च अशा केवळ दोन दिवसात ती रक्कम आपल्या खात्यात वळविली. याप्रकरणी १ जून रोजी वरूड पोलिसांनी अन्स्ट यंग ग्लोबल लिमिटेड, बंगरूळूच्या प्रतिनिधींविरुद्ध फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. गव्हाणे यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी आपल्या कंपनीत ऑनलाईन जॉब असल्याची बतावणी केली. त्यानंतर टेलिग्रामवरून त्यांना लिंक पाठविण्यात आली. तथा टास्क पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले. ते करत असताना गव्हाणे यांना मोठी रक्कम देण्यास प्रवृत्त करण्यात आले.
अवघ्या दोन दिवसांत त्यांच्या बॅंक खात्यातून तब्बल १४ लाख २४ हजार १२० रुपये कपात झाले, मात्र, ना जॉब मिळाला ना नफा. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वरूड पोलीस ठाणे गाठले. तथा आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविली.