आधार कार्ड काढून पाच वर्षे झाली; अपडेट केली का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 04:16 PM2024-06-07T16:16:53+5:302024-06-07T16:18:14+5:30
Amravati : वयाच्या पाचव्या आणि पंधराव्या वर्षी आधार अपडेट करणे आवश्यक
मोहन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर केला जातो. प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. १८ वर्षांवरील नागरिकाकडे मतदान कार्ड, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना असे ओळखपत्र असतात. परंतु, लहान मुलाकडे ओळखीचा पुरावा म्हणून केवळ आधार कार्ड हाच पुरावा असतो. याला वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे असते.
एका दिवसाच्या बालकापासून ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे आधार कार्ड बनविण्यासाठी बायोमेट्रिक डिटेलची गरज नसते. मात्र जेव्हा बालक पाच वर्षांपेक्षा अधिक वयाचे होतो तेव्हा त्याचे आधार कार्ड बनविण्यासाठी बायोमेट्रिक डिटेलची आवश्यकता असते तसेच बालक ५ वर्ष आणि १५ वर्षांचे होते तेव्हा त्याला आधार अपडेट करावे लागते. अनेकदा लहान वयात बनविलेल्या आधार कार्डमध्ये हाताचे ठसे, डोळे यात वयानुसार बदल होत असल्याने ते वेळोवेळी अपडेट करण्याची आवश्यकता असते. यासाठी आधार अपडेट केंद्र, सीएससी सेंटर, बैंक, पोस्ट ऑफिस आदी ठिकाणी आधार अपडेटची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी वेळोवेळी आधार अपडेट करून घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ज्या पालकांनी आपल्या मुलाचे आधारकार्ड अपडेट करून घ्यावे.
मुलांचे आधार पाच वर्षांनंतर अपडेट करणे आवश्यक
पाच वर्षाच्या आतील मुलांचे आधार बनवले जाते तेव्हा त्यांच्या डोळ्यांची बाहुली आणि फिंगर प्रिन्टस विकसित झालेली नसते. त्यामुळे आधार अपडेट करणे गरजेचे आहे.
खर्च किती?
■ आधार केंद्रावर आधार अपडेट करण्यासाठी ५० रुपयांचे शुल्क आकारले जाते.
■ अगदी कमी खर्चात आधार अपडेटची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोठे करणार अपडेट?
जवळच्या आधार केंद्रावर जाऊन त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र देऊन प्रत्येक नागरिक आपल्या आधारमध्ये अद्ययावत माहिती अपडेट करू शकतो. पत्ता, नाव, मोबाइल नंबर, जन्म तारीख आदी दुरुस्त्या करता येतात.
मोठ्यांचे आधार दहा वर्षांनंतर करा अपडेट
नागरिकांनी दहा वर्षांनी आधार अपडेट करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकात शारीरिक बदल होत असतात. त्यामुळे वेळोवेळी आधार अपडेट करणे
महत्त्वाचे असते.कागदपत्रे काय लागतात?
जन्म तारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा, फोटो या शिवाय इतर कागदपत्रे आधार अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर द्यावे लागतात.