मंदिर, मशीद, बुद्ध विहारसह ७०० घरांवर फडकला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:01:16+5:30
शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयांसोबतच प्रत्येक घरावर तो डौलात फडकवा, ही संकल्पना ग्रामपंचायतने प्रत्यक्षात आणली. त्यानुसार सकाळी सर्वप्रथम द्रौपदाबाई देशमुख विद्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातून तिरंगा रॅली काढून गावातील सर्व मंदिर, मशीद, बुद्ध विहार या सर्व धार्मिक स्थळांवरही ध्वजारोहण करण्यात आले. गावातील प्रत्येक घरावर नागरिकांनीही तिरंगा फडकविला.
चांदूर बाजार : तालुक्यातील बेलोरा येथे दहा वर्षांपासून आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून तिरंगा महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा २६ जानेवारीला मंदिर, मशीद, बुद्ध विहारसह ७०० घरांवर तिरंगा फडकला. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या महोत्सवानिमित्त संपूर्ण गाव तिरंगामय झाले होते. ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतील ‘एक गाव तिरंग्याचे’ म्हणून बेलोरा हे राज्यातील एकमेव गाव ठरले.
‘असेल तुला भगवा प्यारा, असेल तुझा हिरवा न्यारा, असेल तुझा निळा प्यारा, मात्र सर्वात उंच तिरंगा आपला’ या संकल्पनेतून बेलोरा ग्रामपंचायततर्फे दरवर्षी तिरंगा महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामपंचायतच्यावतीने घरोघरी या महोत्सवाच्या अक्षता वाटून सोहळ्याला येण्याचे निमंत्रण देण्यात आले. शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयांसोबतच प्रत्येक घरावर तो डौलात फडकवा, ही संकल्पना ग्रामपंचायतने प्रत्यक्षात आणली. त्यानुसार सकाळी सर्वप्रथम द्रौपदाबाई देशमुख विद्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातून तिरंगा रॅली काढून गावातील सर्व मंदिर, मशीद, बुद्ध विहार या सर्व धार्मिक स्थळांवरही ध्वजारोहण करण्यात आले. गावातील प्रत्येक घरावर नागरिकांनीही तिरंगा फडकविला.
ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा ग्रामसचिवालयावर झाला. या ठिकाणी ग्रामस्थ शांताबाई कैतवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या तिरंगा महोत्सवाला ग्रामसचिव जयंत मानकर, सरपंच दीपाली गोंडीकर, उपसरपंच सचिन पावडे, स्वप्निल भोजने, भैया ठाकरे, तुषार देशमुख, श्याम कडू, गौरव झगडे यांच्यासह महिला-पुरुषांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र
सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात आले. या तिरंगा महोत्सवप्रसंगी सर्वात उंच तिरंगा गावातील पुंजाजी महाराज व मारुती महाराज मंदिराच्या कळसावर फडकविण्यात आला होता. प्रथमच गावातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात आला होता.