‘ती’ आत्महत्या नव्हे, अनैतिक संबंधातून खून; आरोपी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 11:13 PM2022-09-24T23:13:46+5:302022-09-24T23:14:22+5:30
पोलिसांचा होरा खरा ठरल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात झाली आणि मृताचा मित्र योगेश सुभाष भाकरे (३२, रा. दिलालपूर) हा हत्येमागील सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. मृत संदीपच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्याची माहिती कळल्याने तो अडसर ठरला होता. यामुळे त्याला दूर करण्याकरिता त्याला दिलालपूर शिवारातील पाथरे यांच्या शेतात दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून त्याचा दुप्पट्याने गळा आवळून खून केला, अशी कबुली योगेशने पोलिसांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : अनैतिक संबंध प्रेयसीच्या पतीला माहिती झाल्याने त्या दोघांच्या आड येणाऱ्या पतीला दारू पिण्याच्या बहाण्याने शेतात बोलावून त्याचा दुप्पट्याने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या दिलालपूर शिवारात घडली. या हत्येला प्रारंभी आत्महत्येचे स्वरूप देण्यात आले होते. पोलिसांनी आरोपीला शनिवारी अटक केली.
संदीप विनायकराव भाकरे (३९, रा. दिलालपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिलालपूर ते सोनोरी शिवारात त्याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी सापडला होता. त्याने विष प्राशन केल्याची फिर्याद त्याच्या नातेवाइकाने चांदूर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी प्रथम मर्ग दाखल केला. तथापि, संशय व्यक्त करीत चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह शवविच्छेदनाकरिता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात हलविला. तेथून प्राप्त शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांचा होरा खरा ठरल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात झाली आणि मृताचा मित्र योगेश सुभाष भाकरे (३२, रा. दिलालपूर) हा हत्येमागील सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. मृत संदीपच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्याची माहिती कळल्याने तो अडसर ठरला होता. यामुळे त्याला दूर करण्याकरिता त्याला दिलालपूर शिवारातील पाथरे यांच्या शेतात दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून त्याचा दुप्पट्याने गळा आवळून खून केला, अशी कबुली योगेशने पोलिसांना दिली.
मृत संदीपचे वडील फिर्यादी विनायक रघुनाथ भाकरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार नोंदवली असून योगेशला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणेदार नरेंद्र पेंदोरसह पीएसआय प्रतिभा मेश्राम, विनोद इंगळे, अजय पाथरे, श्रीकांत निंभोरकर, प्रशांत भटकर, पंकज येवले, महेश काळे, विकी दुर्णे यांनी केली.