अनुदान नव्हे तर संत्रा गळतीचा कायम उपाय हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:16 AM2021-08-20T04:16:55+5:302021-08-20T04:16:55+5:30
चांदूर बाजार - तालुक्यातील संत्राफळ गळतीचे कारण सात वर्षांपासून स्पस्ट होत नसल्यामुळे शेतकरी नागपूर एनआरसीसी कार्यालयात धडकले. तसेच विदर्भ ...
चांदूर बाजार - तालुक्यातील संत्राफळ गळतीचे कारण सात वर्षांपासून स्पस्ट होत नसल्यामुळे शेतकरी नागपूर एनआरसीसी कार्यालयात धडकले. तसेच विदर्भ दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय संसदीय समितीला निवेदन देऊन एनआरसीसीच्या अधिकाऱ्यावर कार्यवाहीची मागणी केली.
तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संत्राफळ गळतीमुळे सात वर्षांपासून कोट्यवधींचा फटका बसत आहे. या समस्येच्या निराकरणासाठी कोट्यवधी खर्च करून नागपूर येथे निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र (एनआरसीसी) कार्यान्वित केले. मात्र, याचा संत्रा उत्पादकांना कोणताही फायदा झाला नाही. या पिकासाठी एनआरसीसीमार्फत कोणत्याही प्रकारचे संशोधनसुद्धा करण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढतच आहे. आम्हाला संत्रा गळतीच्या नुकसानापोटी अनुदान नकोत, कायम उपाय हवा. यासाठी पांढरा हत्ती बनलेल्या एनआरसीसी संशोधन केंद्राची चौकशी करून कार्यवाहीची मागणी चांदूरबाजार तालुक्यातील संत्रा उत्पादकांनी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर केंद्रिय संसदीय समीतीकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली. त्यावर एनआरसीसीवर कारवाई करण्याचे आश्वासन खा. जाधव यांनी दिले. चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्विय सहायक गोलू ठाकूर यांनी केंद्रीय संसदीय समितीला निवेदनातून केली आहे. यावेळी शेतकरी प्रदीप बंड, अभिजित पोहोकार, अरविंद कपले, किशोर थोरात, अरुण दाभाडे, नरेंद्र सुनेसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
बॉक्स
एनआरसीसीच्या अधिकाऱ्यांची दिलगिरी
चांदुर बाजार तालुक्यातील ४० शेतकरी एनआरसीसीच्या नागपूर कार्यालयात बुधवारी धडकले. ४ तास शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्यावर अखेर एनआरसीसीच्या अधिकाऱ्यांनी चूक झाल्याबाबत माफी मागितल्याची माहिती शेतकरी प्रदीप बंड यांनी दिली.