बैठकीत ठरले... शिष्टाईत हरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:11 AM2017-07-25T00:11:32+5:302017-07-25T00:11:32+5:30
उपअभियंता सुहास चव्हाण यांच्या पाठोपाठ अतिक्रमण विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना झालेली मारहाण आणि त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला...
महापालिका कर्मचाऱ्यांचा संप : कुत्तरमारे मारहाण प्रकरण; संप स्थगित
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उपअभियंता सुहास चव्हाण यांच्या पाठोपाठ अतिक्रमण विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना झालेली मारहाण आणि त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा या पार्श्वभूमिवर महापालिका अधिकारी-कर्मचारी संतप्त झाले. सोमवारी पहिल्या प्रहरात झालेल्या बैठकीत बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला. सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत संपाची भूमिका ठरविण्यासाठी मॅराथॉन चर्चा झाली. संपही जाहीर करण्यात आला. तथापि त्यानंतर झालेल्या राजकीय शिष्टाईत कर्मचाऱ्यांचे नेतृत्व कमी पडले. बॅकफूटवर येत अधिकारी- कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी केले. कोतवाल शिष्टाईत हरल्याने शेकडो अधिकारी - कर्मचाऱ्यांनी उद्वेग व्यक्त केला.
महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांना रविवारी आ. रवि राणा यांचेसमक्ष मारहाण करण्यात आली. सोमवारी त्या मारहाणीचे पडसाद महापालिकेत उमटले. कुत्तरमारेविरुद्ध विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट करत पुढील रणनिती बनविण्यासाठी आयुक्तांच्या दालनाशेजारी असलेल्या सभागृहात नरेंद्र वानखडे, महेश देशमुख या उभय उपायुक्तांसह कॅफो प्रेमदास राठोड, एडीटीपी सुरेंद्र कांबळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महापालिकेचे कर्मचारी व मनपा कर्मचारी, कामगार संघाचे पदाधिकारी एकत्र आले.
बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रल्हाद कोतवाल यांनी २४ जुलैपासून महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी बेमुदत संपावर जात असल्याची नोटीस प्रशासनाला दिली. बैठकीत अतिशय जोरकसपणे गणेश कुत्तरमारे यांच्यावरील गुन्हा व मारहाणीचा निषेध करण्यात आला. आता काम करायचे की मार खायचा? हे एकदा स्पष्ट होवूच द्या, अशी भूमिका घेऊन बंदची हाक देण्यात आली. बैठकीतच झोनस्तरावर बंदबाबत कळविण्यात आले. दुपारी २ च्या सुमारास ‘बंद’ सुरू झाल्याची औपचारिक घोषणाही करण्यात आली. मात्र त्यानंतर आयुक्तांच्या दालनासह सभागृहात झालेल्या बैठकीत कोतवाल बॅकफुटवर आले व त्यांनी संप तूर्तास मागे घेत असल्याची घोषणा करून हायहोल्टेज ड्रामा संपुष्टात आणला.
काम करायचे,
अन् मारही खायचा
उपअभियंत्याला झालेल्या मारहाणीची शाई वाळते न वाळते अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुखाला मारहाण झाल्याने महापालिका अधिकारी कर्मचारी उद्विग्न झाले आहेत. काम करायचे, मारही खायचा आणि खोट्या गुन्ह्यात सामाजिक शिक्षा भोगायची, अशी प्रतिक्रिया देत कर्मचाऱ्यांनी संतापाला वाट मोकळी केली. सकाळी १० वाजतापासूनच महापालिकेत बंदसदृश्य स्थिती होती. आम्हीही कुटुंबवत्सल आहोत. राजकारणात आमचा बळी का, असा संतप्त सवालही त्यांचेकडून उपस्थित करण्यात आला. एकाच आठवडयात मारहाणीचे दोन प्रकार घडल्याने कर्मचारी अस्वस्थ झालेत. सोमवारच्या बैठकीत त्यांची अस्वस्थता उघडपणे व्यक्त झाली. कुत्तरमारे यांचेवर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा तातडीने मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी बैठकीदरम्यान करण्यात आली. सुमारे तीन तास झालेल्या बैठकीत बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला. दुपारनंतर संप स्थगित केला.
विरोधी पक्षनेत्यांची मध्यस्थी
विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले आणि बसपाचे गटनेते चेतन पवार यांनी संपाबाबत आयुक्तांसह प्रल्हाद कोतवाल, जीवन सदार व अन्य कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. सुहास चव्हाण प्रकरणात आताच दोन दिवसांपूर्वी बंद पुकारण्यात आला. आता बंद करणे सौजन्याला धरून नसेल. बंद पुकारणे हा पर्याय असू शकत नाही, असा पवित्रा ‘तोडगा’ बैठकीत घेण्यात आला. तीनही पदाधिकाऱ्यांनी कोतवाल आणि सदार यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. त्याचा परिपाक म्हणून कोतवाल यांनी संप तूर्त स्थगित केला
अशा होत्या मागण्या
२३ जुलै रोजी मनपा अधिकाऱ्यावरील हल्ल्यासंदर्भात सचिन भेंडे, आ. रवि राणा व इतर हल्लेखोरांना अटक तसेच संबंधित हल्लेखोर सचिन भेंडे यांचे महापालिकेतील नोंदणीकृत कंत्राटदार म्हणून असलेला परवाना रद्द करावा व त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, कुत्तरमारे यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, कोणत्याही लोकप्रतिनिधींनी मनपा आयुक्तांच्या परवानगीशिवाय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बोलावू नये, आयुक्तांच्या परवानगीशिवाय महापालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांवर प्रशासकीय संदर्भातून निर्माण झालेल्या वादाबाबत कोणत्याही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात येऊ नये.
आश्वासनानंतर संप स्थगित
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाते प्रमुख कुत्तरमारे यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन आ. रवि राणा यांनी दिल्याने संप स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी दिली. मात्र एकदा दाखल झालेले गुन्हे राणा कसे काय मागे घेऊ शकतात, या प्रश्नावर कोतवाल निरूत्तर झाले.