आधी पावसाचा नव्हता पत्ता, आता दराचा संत्र्याला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:16 AM2021-09-14T04:16:38+5:302021-09-14T04:16:38+5:30
वरूड : चांगली लगडलेली फळे भरघोस उत्पन्न देणार अशी शक्यता व्यक्त होत असताना आधी कोरड्या हवामानाने मृग बहराच्या संत्रा ...
वरूड : चांगली लगडलेली फळे भरघोस उत्पन्न देणार अशी शक्यता व्यक्त होत असताना आधी कोरड्या हवामानाने मृग बहराच्या संत्रा फळांना गळती लागली. आता अतिवृष्टीचा संत्र्याच्या बहराला फटका बसत आहे. बाजारात फळांचे दर तेजीत असले तरी व्यापारी स्वस्तात फळे गोळा करीत आहेत. या आतबट्ट्याच्या व्यवहारामुळे हजारोंचा पोशिंदा असलेला संत्राउत्पादक शेतकरी आता शून्यात हरवला आहे.
वरुड तालुका संत्र्यामुळे देशभरात ओळखला जातो. ४०० ते ५०० कोटी रुपयांची उलाढाल संत्रा व्यवसायातून तालुक्यात होत असते. २१ हजार ५०० हेक्टर शेतजमिनीमध्ये संत्री आणि ३ हजार ७९० हेक्टर मध्ये मोसंबीचे पीक आहे. संत्रा उत्पादक शेतकरी आंबिया आणि मृग बहाराची अशी दोन पीक घेतात. डिसेंबर ते जानेवारीमध्ये पाणी सोडले जाऊन आंबिया बहाराचे पीक घेतले ज़ाते, तर जून-जुलैमध्ये पावसाळ्याचे पाणी आल्यावर मृग बहराची पीक घेतली जातात. यावर्षी आंबिया बहाराचे पीक चांगले, तर मृग बहर ४० टक्केच आला आहे. आंबिया बहराला सुरुवातीला पावसाच्या दडीने फटका बसला. आता अतिपावसाचा फटका बसल्याने संत्री जमीनदोस्त होऊ लागला आहे. ३० ते ४० टक्के संत्री गळती झाली असून व्यापाऱ्यांनीसुद्धा पाठ फिरविली आहे. दोन ते तीन हजार रुपये प्रति हजार फळाला भाव मिळत आहे.
-------------------
बाजार समितीत ४० मंडई
देशाच्या कानाकोपऱ्यासह बांगलादेश, दुबई येथेसुद्धा संत्री पाठविली जातात. बाजार समितीच्या संत्रा यार्डमध्ये ४० मंडई आहेत, तर बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात पॅकिंग सेंटर आणि फळ ग्रेडिंग केंद्र आहे. शेकडो ट्रक संत्री दिल्ली, आग्रा, लुधियाना, पंजाब, केरळ, मुंबई, तामीलनाडू आदी परप्रांतातील बाजारपेठेत येथून पाठविली जातात.
--------------------
सुरुवातीला पाऊस आला नाही म्हणून तापमानाने, तर आता अतिपावसामुळे ४० टक्के संत्री गळाली आहेत. संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. शासनाने प्रक्रिया उद्योग सुरू केल्यासच संत्राला सुगीचे दिवस येतील.
- उद्धव फुटाणे, संत्रा उत्पादक, तिवसाघाट
-------------------
आंबिया बहराचे संत्रा पीक चांगले असले तरी फळे हिरवी असल्याने खाण्यायोग्य झाली नाहीत. तर बांगलादेशने निर्यात कर वाढविल्याने संत्र्याला भाव कमी मिळत आहेत. दोन ते तीन हजार रुपये प्रति हजार दराने संत्री खरेदी होत आहे. यातच अतिपावसामुळे बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- जावेदखान पठाण, संत्रा व्यापारी, वरूड