आसरा येथे बालकांच्या सहभागातून साकारली वाचन समृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:22 AM2019-07-21T01:22:40+5:302019-07-21T01:23:09+5:30
भातकुली तालुक्यातील आसरा येथे मुले व तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या वाचनालयाला ना शासकीय अनुदान मिळविले, ना बाहेरून कुणाची मदत. नोंदणी करणार नाही, शासकीय अनुदान घेणार नाही, गावातील कुणाला वर्गणीही मागणार नाही, स्वेच्छेने जर कुणी दिली तर घ्यायची, असा संकल्प स्थापनेच्या वेळी घेण्यात आला.
अमोल भारसाकळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गणोरी : भातकुली तालुक्यातील आसरा येथे मुले व तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या वाचनालयाला ना शासकीय अनुदान मिळविले, ना बाहेरून कुणाची मदत. नोंदणी करणार नाही, शासकीय अनुदान घेणार नाही, गावातील कुणाला वर्गणीही मागणार नाही, स्वेच्छेने जर कुणी दिली तर घ्यायची, असा संकल्प स्थापनेच्या वेळी घेण्यात आला. या तत्त्वावर १ जानेवारी २०१७ पासून सुरू झालेले सद्गुरू नारायण महाराज बालसंस्कार मंडळाचे हे वाचनालय कार्यरत आहे.
आसरा या गावातील लोकांकरिता लोकसहभागातून वाचनालयाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. वाचनालयामध्ये वर्तमानपत्र, रोजगार वार्ता, विविध मासिके, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक पुस्तके तथा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांकरिता स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे दालन खुले केले आहे. सदस्य होण्यापासूनच्या सर्व सुविधा येथे मोफत दिल्या जातात. वाचनालयात जे पुस्तक उपलब्ध नाही, त्याची नोंद जर नोंदवहीत केली, तर ते पुस्तक १५ दिवसांच्या आत वाचनालयात उपलब्ध केले जाते, हे विशेष.