महिलांचाच पुढाकार ठरणार महत्त्वाचा
By admin | Published: May 30, 2017 12:18 AM2017-05-30T00:18:52+5:302017-05-30T00:18:52+5:30
कोकर्डा येथील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा पुढकार महत्त्वाचा असल्याने आजूबाजूच्या गावांतील महिला कोकर्ड्याच्या महिलांची समजूत घालत आहेत.
पत्रके वाटून प्रचार : याआधीही झाले होते दारू दुकान बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : कोकर्डा येथील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महिलांचा पुढकार महत्त्वाचा असल्याने आजूबाजूच्या गावांतील महिला कोकर्ड्याच्या महिलांची समजूत घालत आहेत. दारू दुकान बंद करायचे असेल तर महिलांनी एकत्र यावे, यासाठी जागर केला जात आहे.
कोकर्डा येथील दारू दुकान बंद करण्यात यावे, यासाठी शेंडगाव, खासपूर येथील महिलांनी आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या तीव्रतेमुळे प्रशासनाला दारू दुकानाला सील ठोकावे लागले. सध्या हे दारू दुकान बंद आहे. दुकान सुरू राहावे किंवा नाही यासाठी ३ जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. शेंडगाव ते खासपूरच्या महिलांना ग्रामसभेमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी कोकर्डा गावामध्ये घरोघरी जाऊन महिलांना भेटून दारुपासून काय नुकसान होते याची माहिती देणारे पत्रक वाटत आहेत. कोकर्डा गावातील देशी दारू दुकान महिलाच हटवू शकता, असे समजूत घालत आहे. महिलांची उपस्थितीत विशेष ग्रामसभेत दारू दुकान बंद करण्याचा ठराव घेतला जाईल. यामुळे त्यांची उपस्थिती गरजेची आहे.
महिलांची ५० टक्के उपस्थिती आवश्यक
महाराष्ट्र शासनाने अधिनियमान्वये तयार केलेले राजपत्रानुसार दारू दुकान बंद होण्यासाठी रीतसर प्रक्रिया आवश्यक असल्याने या विषयासाठी ३ जूनला बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेला महिलांची ५० टक्क्यांवर उपस्थिती आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे आंदोलनस्थळी शेंडगाव, खासपूर या गावच्या महिलांची संख्या जास्त होती, तर कोकर्डा गावातील बोटावर मोजण्या इतक्याच महिला आंदोलनस्थळी उपस्थित होत्या.
राजकीय दबावाचा प्रयत्न
कोकर्डा गावातील झेंडा चौकामध्ये असलेले देशी दारु दुकान शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दि. ३१-१-२००१ ला बंद करून १-२-२००१ पासून पुन्हा सुरू करण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा अश्याच प्रकारचे आंदोलन करण्यात आले होते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोकर्डा ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांपैकी ९ सदस्य हे एका विशिष्ट गटाचे असल्याने गावातील महिला किती प्रमाणात उपस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.