आयटीआयला गर्दी मावेना अन पॉलिटेक्निकला विद्यार्थी सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 05:54 PM2018-10-24T17:54:17+5:302018-10-24T17:55:58+5:30
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमानंतर आता तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था प्रवेशाअभावी ओस पडू लागल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमानंतर आता तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था प्रवेशाअभावी ओस पडू लागल्या आहेत. दुसरीकडे आयटीआयला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टचा सामना करावा आहे. आतापर्यंत चार फेऱ्यांमध्ये सुमारे ८० हजार विद्यार्थ्यांनी आयटीआयत प्रवेश घेतला. आयटीआयला गर्दी मावेना अन पॉलिटेक्निकला विद्यार्थी सापडेना, असे विदारक चित्र आहे.
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण (आयटीआय) किंवा तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रवेशाला पसंती देतात. एकाच वेळी प्रवेशाचीे प्रक्रिया सुरू होत असल्याने विद्यार्थी दोन्ही ठिकाणी अर्ज करीत असले तरी आयटीआयला पसंती दिल्याचे दिसून आले. राज्यात पॉलिटेक्निकमध्ये १ लाख ३० हजार ८०० जागांसाठी प्रवेश होते. त्यासाठी निम्म्याहून कमी म्हणजे ५७ हजार ९९७ जागांसाठी अर्ज तंत्र शिक्षण विभागाकडे आले. आयटीआय अभ्यासक्रमाच्या १ लाख ३८ हजार ३१७ जागांच्या प्रवेशासाठी तब्बल ३ लाख ९५ हजार १७४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. चार फेºयांच्या अखेरीस सुमारे ८० हजार प्रवेश निश्चित झाले आहेत.
तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमातून रोजगाराची संधी मिळण्याची आशा मावळल्याने या संस्थांना उतरती कळा लागली आहे. अनुदानित महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. गत तीन वर्षांपासून खासगी आणि अनुदानित संस्थांच्या प्रवेशाची गर्दी ओसरली आहे. दहावी निकालाची टक्केवारी वाढली असली तरी पॉलिटेक्निकऐवजी आयटीआय प्रवेशाला विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे वास्तव आहे.
अमरावतीत आयटीआयमध्ये १४ हजार ८११ प्रवेश
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात १४ हजार ८११ विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश देण्यात आला. यात अमरावती ४२३९, अकोला २९०९, वाशिम ११६५ यवतमाळ ३६७८, तर बुलडाणा जिल्ह्यात ३०५९ प्रवेश झाले आहेत. विभागात शासकीय ६३ आणि १६ खासगी आयटीआय आहेत.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणारा विद्यार्थी हमखास रोजगार मिळवितो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रवेशासाठी दरवर्षी गर्दी वाढतच आहे.
- पी.टी. देवतळे, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अमरावती.