‘आयटीकॅान्स’ला आता स्थायीच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:38+5:302021-07-14T04:15:38+5:30
अमरावती :महापालिकेत मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट एल-१ ठरलेल्या ‘आयटीकॉन्स’ या संस्थेला जवळजवळ निश्चित झालेला आहे. अन्य पाच संस्था आता स्पर्धेतून ...
अमरावती :महापालिकेत मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट एल-१ ठरलेल्या ‘आयटीकॉन्स’ या संस्थेला जवळजवळ निश्चित झालेला आहे. अन्य पाच संस्था आता स्पर्धेतून बाद झाल्याची माहिती आहे. दरम्यान आक्षेपाची मुदत संपल्याने कुठल्याही संस्थेचे आक्षेप स्विकारल्या जाणार नसल्याचे उपायुक्त सुरेश पाटील यांनी सांगितले.
कधी नव्हे ते यंदा महापालिकेला मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट बहुचर्चीत झाला. १४ मे रोजी ही निविदा काढण्यात आली, तत्पूर्वी जुन्या एजन्सीला तीन महिन्याची मुदतवाढ स्थायी समितीने दिली होती. या निविदेचे टेक्निकल बिड ३१ मे रोजी उघडण्यात आले. त्यात दोन संस्था बाद झाल्या होत्या,. त्यानंतर उर्वरीत सहा संस्थांमधून एल-१ निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु झाली. यामध्ये पाच संस्थाच्या तुलनेत ‘आयटी कॉन्स’ ही संस्था एल-१ ठरली असल्याचे प्रशासनाने सांगितले. यासंदर्भातील टिपणी तयार झालेली असून ती आता आयुक्तांकडे जाईल व त्यानंतर स्थायी समितीमध्ये त्यावर चर्चा होवून पुठची प्रक्रिया होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. दरम्यान पात्रतेचे निकष अन्य कंत्राटदारांना मान्य नसल्याने त्यांच्याद्वारा न्यायालयात दाद मागल्या जाण्याची शक्यता आहे.
बॉक्स
‘त्या’ संस्थेने नोंदविला मंगळवारी आक्षेप
निकषामध्ये प्रशासनाने बाद ठरविलेल्या महात्मा फुले मल्टी सर्विसेस या संस्थेने मंगळवारी उपायुक्त सुरेश पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे आक्षेप नोंदविला. त्यानूसार संस्था एल-१ असल्याने कार्यारंभ आदेश देण्याची मागणी केली. याशिवाय अनेक मुद्दे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनात आणले. मात्र, आक्षेपाची मुदत संपल्याने आता यावर विचार करता येणार नसल्याचे उपायुक्तांनी सांगितले.