आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळणार दहावी-बारावी समकक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:13 AM2021-02-10T04:13:55+5:302021-02-10T04:13:55+5:30
अमरावती: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयटीआय व्यवसाय शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदापासून दहावी-बारावीची समकक्षता मिळणार आहे. त्यामुळे पारंपरिक ...
अमरावती: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयटीआय व्यवसाय शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदापासून दहावी-बारावीची समकक्षता मिळणार आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण घेऊन दहावी-बारावीच्या गुणपत्रिका मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्यामुळे आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. विभागात ६३ शासकीय तर २७ खासगी व जिल्ह्यात १८ शासकीय व ९ खासगी मिळून २७ आयटीआय आहेत. यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आयटीआय झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी इतर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा लागतो. दहावी-बारावी समकक्षता आयटीआयच्या विद्यार्थ्यांना देण्याची मागील बऱ्याच वर्षांपासून केली जात होती. त्यानुसार आता शासन निर्णय घेतला आहे. आयटीआयमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दहावी-बारावीची समकक्षता देण्यासाठी सर्व शासकीय व शासन मान्यताप्राप्त खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे अर्ज करावा लागणार आहे. मंडळाच्या मान्यता व सांकेतिक क्रमांक घ्यावा लागणार आहे. त्यानंतर आयटीआयच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे घेणाऱ्या येणाऱ्या दहावी- बारावी प्रमाणपत्र परीक्षा ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसह समकक्षता मिळणार आहे.
बॉक्स
नियमित प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही दोन भाषा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी श्रेणी विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून आयटीआयमध्ये एक किंवा दोन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी नियमित प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
कोट
आयटीआय केल्यानंतर इतर डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेश मिळत होता. परंतु आता दहावी-बारावीची समकक्षता मिळाल्याने काही विद्यार्थ्यांना बीए, बीकॉम, बीएस्सी यासारख्या पारंपरिक अभ्यासक्रमाचे पुढील शिक्षण घेता येईल. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.
नरेंद्र येते
सहसंचालक
आयटीआय अमरावती