आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 10:52 PM2018-07-13T22:52:30+5:302018-07-13T22:53:03+5:30
स्थानिक आयटीआयमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेला ११ जुलैपासून सुरुवात झाली. प्रवेश फेरीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत १८७ प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिली प्रवेश फेरी १५ जुलैपर्यंत चालणार आहे. कौशल्य विकासामुळे विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे ओढा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक आयटीआयमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेला ११ जुलैपासून सुरुवात झाली. प्रवेश फेरीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत १८७ प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिली प्रवेश फेरी १५ जुलैपर्यंत चालणार आहे. कौशल्य विकासामुळे विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे ओढा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण २७ ट्रेड असून प्रवेश क्षमता ११५२ आहे. औद्योगिकीकरणामुळे कुशल तंत्रज्ञांची वाढती गरज लक्षात घेऊन विद्यार्थी आयटीआय प्रवेशाला प्राधान्य देत आहेत. मागील काही वर्षांत दहावी-बारावीच्या निकालाचा टक्का वाढल्यामुळे आयटीआय प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून, गुणवत्ता क्रमानुसार प्रवेश देण्यात येत आहे. फिटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, मशिनिस्ट, मोटर मेकॅनिक आदी ट्रेडला विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे. १ जून पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
पहिली गुणवत्ता यादी १० जुलैला जाहीर होताच ११ जुलैपासून प्रवेशाला प्रारंभ झाला आहे. पुढील दोन दिवस ही प्रक्रिया चालणार आहे. यानंतर उपलब्ध जागा नुसार प्रवेश फेरी होईल. अंतिम फेरी आॅगस्ट महिन्यात होणार आहे.
या व्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश
यांत्रिकी कर्षित्र, गवंडीकाम, संधाता, फाँड्रीमन, सुतारकाम, प्लास्टिक प्रोसेसिंग आॅपरेटर, यांत्रिकी डिझेल, नळ कारागीर, कम्प्यूटर आॅपरेटर अँड प्रोग्रॅमिंग, स्टेनोग्राफी अँड सेक्रेटरीअल असिस्टंट, कटिंग व सुइंग (कर्तन व शिवण) हे व्यवसाय प्रशिक्षण एक वर्षाचे आहेत. दोन वर्षे मुदतीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात तारतंत्री, जोडारी, कातारी, यंत्रकारागीर, आरेखक यांत्रिकी, वीजतंत्री, यंत्रकारागीर घर्षक, पेंटर जनरल, यांत्रिक प्रशितन व वातानुकूलन, मेकॅनिक मोटर व्हिकल, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलाजी सिस्टीम मेन्टनंस, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, आरेखक वास्तुशास्त्र, इलेक्ट्रोप्लेटर, टूल अॅण्ड डायमेकर, आरेखक वास्तू व अल्पसंख्याकांसाठी एक वर्ष व्यवसाय प्रशिक्षणासाठी फाँड्रीमॅन, नळ कारागीर, कटीग अँड सुइंग, यांत्रिकी डिझेल आदी व्यवसायांच्या प्रशिक्षणासाठी सध्या प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
उच्चशिक्षणासाठी वाढते शुल्क सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना पेलवणारी नसते तसेच बेरोजगारीची समस्या ही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण घेऊन कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध होत असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे.
- सचिन धुमाळ
प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था
प्रवेश फेरीचे वेळापत्रक
पहिली फेरी ११ ते १५ जुलै
दुसरी फेरी २१ ते २५ जुलै
तिसरी फेरी ३१ जुलै ते ३ आॅगस्ट
चौथी फेरी ८ ते ११ आॅगस्ट