रक्तदान जनजागृतीसाठी जयदेव राऊत यांची सायकलवर भारत भ्रमंती

By उज्वल भालेकर | Published: March 26, 2023 06:58 PM2023-03-26T18:58:07+5:302023-03-26T18:58:16+5:30

देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत, तसेच प्रत्येक घरात रक्तदाता हा संदेश पोहोचविण्यासाठी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रहिवासी जयदेव राऊत हे सध्या देशभरात सायकलवर प्रवास करून जनजागृती करत आहेत. 

Jaidev Raut, a resident of West Bengal's Hooghly district, is currently traveling across the country on a bicycle to spread the message of blood donation to every citizen of the country, as well as to every household | रक्तदान जनजागृतीसाठी जयदेव राऊत यांची सायकलवर भारत भ्रमंती

रक्तदान जनजागृतीसाठी जयदेव राऊत यांची सायकलवर भारत भ्रमंती

googlenewsNext

अमरावती : देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत, तसेच प्रत्येक घरात रक्तदाता हा संदेश पोहोचविण्यासाठी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रहिवासी जयदेव राऊत हे सध्या देशभरात सायकलवर प्रवास करून जनजागृती करत आहेत. पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी दहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ते २५ मार्च रोजी सायंकाळी अमरावतीमध्ये पोहोचले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील रक्तपेढीला त्यांनी भेट देत जिल्ह्यातील रक्तदान चळवळीविषयी माहिती जाणून घेतली.

रक्तदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे. त्याअनुषंगाने देशभरात रक्तदान जनजागृतीसाठी पश्चिम बंगाल येथील जयदेव राऊत हे १ ऑक्टोबर २०२२ पासून सायकलने देशभरात प्रवास करत आहेत. फेडरेशन ऑफ ब्लड डोनर ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे ते ब्रँड ॲम्बेसिडरदेखील आहेत. ते देशातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील रक्तपेढींना भेटी देत आहेत. रक्तपेढीच्या माध्यमातून तेथील काही शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन ते रक्तदानाचे महत्त्व पटवून देत आहेत.

महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, मालेगाव, जळगाव, अकोला या जिल्ह्यांचा प्रवास करून ते अमरावतीमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी इर्विन येथील रक्तपेढीला भेट दिली. यावेळी रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. श्रीकांत झापर्डे, डॉ. संदेश यमलवाड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, वैज्ञानिक अधिकारी अनिल तेलमोरे, मंगेश गाढवे, परिचर गजानन इंगळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जयदेव राऊत हे तीन दिवस अमरावतीमध्ये मुक्काम करणार असून या दिवसांमध्ये ते विविध ठिकाणी भेटी देऊन रक्तदानाविषयी जनजागृती करणार आहेत.
 
प्रत्येक घरात रक्तदाता निर्माण व्हावा
कोणत्याही रुग्णाला रक्ताअभावी प्राण गमवावे लागू नये यासाठी नागरिकांमध्ये रक्तदान चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. देशात रक्ताची गरज लक्षात घेता, प्रत्येक घरामध्ये रक्तदाता तयार व्हावा. या उद्देशाने देशभरात सायकलने प्रवास करून रक्तदानाविषयी जनजागृती करत आहेत. दहा हजार किलाेमीटरचा प्रवास पूर्ण करून अमरावतीमध्ये पोहोचलो असून, येथील शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदानाविषयी जनजागृती करणार असल्याचे जयदेव राऊत यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.

  

Web Title: Jaidev Raut, a resident of West Bengal's Hooghly district, is currently traveling across the country on a bicycle to spread the message of blood donation to every citizen of the country, as well as to every household

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.