राज्यातील तुरुंगांमध्ये १३७ टक्के कैदी, ५४ कारागृहे हाऊसफुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 06:21 PM2018-01-08T18:21:27+5:302018-01-08T18:21:37+5:30
राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून, ते प्रमाण तब्बल १३७ टक्के आहे. यामुळे कैद्यांच्या सुरक्षिततेसह अन्य प्रश्न निर्माण झाले आहेत.
प्रदीप भाकरे
अमरावती : राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून, ते प्रमाण तब्बल १३७ टक्के आहे. यामुळे कैद्यांच्या सुरक्षिततेसह अन्य प्रश्न निर्माण झाले आहेत. कारागृहांमधील बराकींची संख्या वाढविण्याबरोबर मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे नवीन कारागृह उभारणी प्रस्तावित आहे. त्या पार्श्वभूमीवर कारागृहांची कैदी सामावून घेण्याची क्षमता आणि प्रत्यक्षात असलेले कैदी यातील विषमता नव्याने अधोरेखित झाली आहे.
राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत, तर वर्ग १ चे १९ , वर्ग २ चे २३ व वर्ग ३ चे ३ अशी एकूण ५४ कारागृहे आहेत. यात विशेष कारागृह, खुले कारागृह, महिला कारागृह, खुली वसाहत, किशोर सुधारालय व कारागृह रुग्णालयांचा सामावेश आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये संख्येनुसार, राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेच्या १३७ टक्के कैदी तूर्तास आहेत.
सर्व कारागृहांची अधिकृत बंदिसंख्या २३ हजार ९४२ अशी असताना, प्रत्यक्षात ३२ हजार ७८५ कैदी कारावास भोगत आहेत. यातील नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये २२ हजार १३५ पुरुष व ६७० महिला कैदी आहेत. १९ अ-वर्ग जिल्हा कारागृहांमध्ये ५ हजार ५०२ पुरुष, तर २०७ महिला कैदी आहेत. २३ वर्ग-२ मध्ये मोडणा-या जिल्हा कारागृहांमध्ये ३ हजार ५३५ पुरुष व ५२९ महिला, तर वर्ग ३ च्या तीन कारागृहांमध्ये २०० पुरुष व ३ महिला असे एकूण ३२ हजार ७८५ कैदी आहेत.
महिला कैद्यांचे प्रमाणही अधिक
तुरुंगातील क्षमतेपेक्षा महिला कैद्यांचे प्रमाण ११७ टक्के आहे. राज्यातील ५४ कारागृहांची महिला बंदींची क्षमता १२०१ आहे. प्रत्यक्षात १४१३ महिला कैदी आहेत. भायखळा तुरुंगात मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महिला कैद्यांची जादा संख्या व त्यांची सुरक्षितता चव्हाट्यावर आली आहे. या १४१३ महिला बंद्यांमध्ये १०४९ न्यायाधीन, तर ३६४ सिद्धदोष कैदी आहेत.
कारागृहातील बंद्यांची संख्या
बंदी प्रकार पुरुष स्त्री एकूण
सिद्धदोष ८७७ ३६४ ८८३४
न्यायाधीन २२८०८ १०४९ २३८५७
स्थानबद्ध ९४ ० ९४