‘जैन’ चिवड्यात तळलेली पाल
By admin | Published: May 2, 2017 12:36 AM2017-05-02T00:36:20+5:302017-05-02T00:36:20+5:30
मनभरी पाठोपाठ आता ‘जैन’ कंपनीच्या चिवडा पाकिटातही चक्क तळलेली पाल आढळून आल्याने खाद्यपदार्थांची विश्वासार्हता पुन्हा एका चव्हाट्यावर आली आहे.
खळबळ : ग्राहकाला मळमळ-उलट्या, एफडीएकडे तक्रार करणार
अमरावती : मनभरी पाठोपाठ आता ‘जैन’ कंपनीच्या चिवडा पाकिटातही चक्क तळलेली पाल आढळून आल्याने खाद्यपदार्थांची विश्वासार्हता पुन्हा एका चव्हाट्यावर आली आहे. संजय गांधीनगरातील नागरिक शरद पखाले यांनी शामनगरातील ‘मातोश्री सेल्स’ या दुकानातून खरेदी केलेल्या या चिवड्यात ही पाल आढळून आली. २९ एप्रिल रोजी हा प्रकार उघडकीस आला.
इतक उत्पादनांच्या तुलनेत स्वस्त दरात उपलब्ध होणारा जैन चिवडा मोठ्या संख्येने ग्राहक खरेदी करतात. घराघरात तो खाल्ला जातो. मात्र, आता या चिवड्याच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह लागले आहे. शरद पखाले यांनी २९ एप्रिल रोजी शामनगरातील मातोश्री सेल्स या दुकानातून जैन चिवड्याचे पाकिट खरेदी केले.
जनतेचे आरोग्य धोक्यात
अमरावती : त्यांनी घरी जाऊन ते उघडले असता व त्यातील दोन चार घास खाल्ल्यानंतर त्यांना त्यात चक्क तळलेली पाल आढळून आली. त्यांनी १ मे रोजी सोमवारी संबंधित दुकानदाराकडे जाऊन हा प्रकार सांगितला. त्यावर दुकानदाराने चिवड्याचे पाकिट बदलवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, पालयुक्त चिवडा थोडासा पोटात गेल्यानंतर शरद पखाले यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांचे डोकेही दुखू लागले. त्यांनी लगेच जिल्हा सामान्य रूग्णालयात जाऊन स्वत:ची तपासणी करून घेतली. आता या प्रकाराची शरद पखाले हे एफडीएकडे तक्रार करणार आहेत. (प्रतिनिधी)
विश्वासार्हता वाऱ्यावर
खाद्यपदार्थांची विश्वासार्हता नेहमीच चव्हाट्यावर येत असते. एफडीएच्या दुर्लक्षाने खाद्यपदार्थ उत्पादक व विक्रेत्यांवर कोणताच अंकुश राहिलेला नाही. ग्राहकांच्या आरोेग्यालाच धोका निर्माण झाला.
रघुवीर, मनभरी पाठोपाठ आता जैन
काही महिन्यांपूर्वी रघुवीरच्या कचोरीत अळी आढळली होती. त्यानंतर मनभरीच्या चिवड्यात तळलेली पाल आढळली होती. पश्चात सोयाभेळमध्ये तळलेले झुरळ आणि अगदी अलिकडेच सँडविच ब्रेडमध्ये बुरशी आढळली होती. हे सगळे प्रकार ‘लोकमत’नेच उघडकीस आणून नंतर लाऊन धरले होते, हे विशेष. आता जैन चिवड्यात तळलेली पाल आढळल्याची माहिती ग्राहकाने ‘लोकमत’ला दिली. लोकमतने खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत केलेल्या सर्वंकष जनजागृतीचा हा परिणाम आहे. यानंतरही असले काही प्रकार आढळल्यास नागरिक ‘लोकमत’शी संपर्क साधू शकतात.