‘सम्मेद शिखरजी’साठी सकल जैन समाज एकवटला; पर्यटनस्थळाचा आदेश रद्द करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 10:46 AM2022-12-24T10:46:26+5:302022-12-24T10:46:47+5:30
मूक मोर्चाद्वारे धडक; जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन
अमरावती :झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी या पवित्र तीर्थक्षेत्राचा केंद्र शासनाने पर्यटनस्थळाच्या यादीत समावेश केलेला आहे. त्यामुळे या तीर्थस्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी सकल जैन समाज एकवटला आहे. यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केंद्र शासनाने निर्णय मागे घेण्याची मागणी केली.
सकल जैन बांधवांनी मागणीच्या अनुषंगाने काढलेल्या मूक मोर्चाने शासन-प्रशासनाचा लक्ष्यवेध केला. या मोर्चात पुरुषांसोबत महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. निवेदनाद्वारे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, झारखंडचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
पर्यटनस्थळाच्या यादीतून या तीर्थक्षेत्राचे नाव वगळण्यात यावे
केंद्र सरकारने पर्यटनस्थळांच्या यादीत या पवित्र तीर्थक्षेत्राचा समावेश केल्याने या ठिकाणी नॉनव्हेज हॉटेल सुरू होतील. पर्यावरणाचेही नुकसान होईल व या पवित्र तीर्थस्थळाचे पावित्र्य धोक्यात येईल, अशी भावना जैन समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटनस्थळाच्या यादीतून सम्मेद शिखरजी या पवित्र तीर्थक्षेत्राचे नाव वगळण्यात यावे, अशी मागणी सकल जैन समाजबांधवांनी केली आहे.