गणोजा देवी येथील पूरग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन, दोन तास वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 02:46 PM2021-09-30T14:46:52+5:302021-09-30T14:48:36+5:30
पेढी नदीवर पूल व रस्त्यासह विविध मागण्यांसाठी गणोजा देवी येथील लोकांनी जलसमाधी आंदोलन केले. यामुळे भातकुली-अमरावती रस्ता दोन तास ठप्प होता. आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अमरावती : भातकुली तालुक्यातील गणोजा देवी येथील पुलासह विविध मागण्यांसाठी पूरग्रस्तांनी पेढी नदीच्या पात्रात बुधवारी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने मोर्चा अडविल्याने मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन सुरू केले. यामुळे भातकुली-अमरावती रस्ता दोन तास ठप्प होता. आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गणोजा येथे पेढी नदीच्या पलीकडील काठावर सुमारे पन्नास वर्षांपासून ३०० लोकांची वस्ती आहे. या वस्तीतील लोकांना पावसाळ्यात पूर आल्यास दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पेढी नदीवर पूल व रस्त्यासह विविध मागण्यांसाठी युवा लायन्सच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता जलसमाधी आंदोलनासाठी हे आंदोलनकर्ते सज्ज झाले होते. बसस्थानक चौकातून निघालेला मोर्चा पोलिसांनी पेढी नदीच्या पुलाच्या अलीकडेच अडवला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन केले. यावेळी तणाव निर्माण झाला होता.
वाहतुकीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अखेर उपविभागीय अधिकारी विजय व्यवहारे, तहसीलदार नीता लबडे, सहायक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून समस्यांबाबत शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासन सज्ज
पोलीस बंदोबस्तगणोजा येथील सुमारे तीनशे पुरग्रस्त जलसमाधी आंदोलनात सहभागी होणार असल्याने सकाळीच अमरावती येथून रेस्क्यू ऑपरेशन टीम सर्व साहित्यानिशी पेढी नदीच्या काठावर सज्ज झाली होती. पूरग्रस्तांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. पोलिसांनी आंदोलकांचा मोर्चा अडविल्याने शांततेत आंदोलन पार पडले.
सुमारे दोन तास वाहतूक ठप्प
पुरग्रस्तांचे जलसमाधी आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाने भातकुली ते अमरावती राज्य मार्गावर पेढी नदीच्या पुलाजवळ दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावले होते. सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.