रासायनिक खताच्या अवैध साठवणुकीचे जळगाव कनेक्शन उघड, अमरावती पोलिसांची संयुक्त कार्यवाही
By प्रदीप भाकरे | Published: August 21, 2023 05:25 PM2023-08-21T17:25:52+5:302023-08-21T17:26:20+5:30
पथक जबलपूर अन् धुळ्याला
अमरावती : माहुली जहांगिर ते सालोरा खुर्द मार्गावरील अनंत वाढोकर याच्या शेतातील गोडावूनमधून पोलिसांनी सुमारे २.३९ कोटी रुपयांचा रासायनिक खतांचा साठा व ट्रक व अन्य साहित्य जप्त केले होते. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या त्या कारवाईदरम्यान माहुली पोलिसांनी दोन चालकांसह स्थानिक गोडाऊन किपर व शेतमालकाला अटक केली. उर्वरित आरोपींच्या शोधार्थ ग्रामीण पोलिसांचे पथक जळगाव जिल्ह्यात गेले असता, तेथील एका गावातील सेवा सहकारी सोसायटीच्या गोडाऊनमधून अमरावती पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी जळगाव पोलीस व कृषी विभागाच्या सहाय्याने रासायनिक खतांचा मोठा साठा जप्त केला. त्यामुळे रासायनिक खतांच्या अवैध साठवणुकीचे जळगाव कनेक्शन उघड झाले आहे.
तत्पुर्वी, माहुली जहांगिर पोलिसांच्या पंचनाम्यानुसार तेथील गोडाऊनमधून हैद्राबाद, मंडला, जबलपूर येथील कंपनीचे २५ किलो व ४० किलोच्या पॅकींगमधील महाराष्ट्रात विक्री करीता प्रतिबंधीत असलेला खत साठा गोडावून व दोन ट्रकमधून जप्त करण्यात आला होता. त्याप्रकरणी, चाैघांना अटक केल्यानंतर प्रकरणाचे पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी २० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली तीन पोलीस पथके जबलपूर, जळगाव व धुळे येथे पाठविली आहेत. त्यातील जळगावला गेलेल्या पोलीस निरिक्षक सुनिल साळुंखे यांच्या नेतृत्वातील पथकाच्या हाती तेथे खतांचा मोठा साठा हाती आला आहे. तर मध्यप्रदेशातील जबलपूर येथे देखील स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणच्या गोडाऊनची झाडाझडती अमरावती पोलिसांनी चालविली आहे.