शिक्षकांच्या ऑनलाईन वेतनासाठी ‘जालना पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:17+5:302021-06-20T04:10:17+5:30

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत १४ तालुक्यांमध्ये जवळपास ५९३२ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांचे वेतन दरमहा ऑफलाईन ...

'Jalna pattern' for teachers' online pay | शिक्षकांच्या ऑनलाईन वेतनासाठी ‘जालना पॅटर्न’

शिक्षकांच्या ऑनलाईन वेतनासाठी ‘जालना पॅटर्न’

Next

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत १४ तालुक्यांमध्ये जवळपास ५९३२ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांचे वेतन दरमहा ऑफलाईन पद्धतीने होत आहे. डोकेदुखी ठरणारी ही प्रक्रिया बदलून यापुढे शिक्षकांचे वेतन ऑनलाईन सीएमपी प्रणालीने करण्याच्या अनुषंगाने शिक्षण सभापतींच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय अभ्यास समिती २२ जून रोजी जालना दौऱ्यावर जाणार आहे. यावर शुक्रवारी स्थायी समितीने शिक्कामोर्तब केले.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन जालना, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सीएमपी प्रणालीद्वारे अदा केले जात आहे. त्यामुळे सीएमपी प्रणालीची माहिती जाणून घेण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती सुरेश निमकर यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एजाज खान यांच्यासह १० जणांची अभ्यास समिती २२ जून रोजी रोजी जालना जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. या ठिकाणी सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन कशा पद्धतीने अदा केले जाते, याचा विस्तृत अभ्यास समिती करणार आहे. विशेष म्हणजे, स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारीत १४ तालुक्यांमध्ये ५ हजार ९३२ हून अधिकारी, शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना दरमहा सीएमपी प्रणालीद्वारे वेतन अदा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, ही प्रक्रिया अद्यापही जिल्हा परिषदेमार्फत राबविली जात नाही. त्यामुळे शिक्षकांचे वेतन एक ते दोन महिने मिळत नाही. वेतनालाही बराच वेळ लागतो. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने वेतन गुंडाळण्याची तयारी जिल्हा परिषदेने केली आहे.

बॉक्स

सीएमपी प्रणालीचे फायदे

शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी प्रणाली राबवून यामार्फत वेतन अदा केल्यास वेतनाची प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. याकरिता झेडपी स्थायी समितीने यापुढे सीएमपी प्रणालीने वेतन देण्यासाठीची प्रक्रिया कशी राबविली जाते, याकरिता काय उपाययोजना करण्याची गरज आहे व अन्य बाबीचा अभ्यास करण्यासाठी दहा जणांची समितीने अभ्यास केल्यानंतर हा प्रयोग येथील जिल्हा परिषदेत राबविण्यात येणार आहे.

Web Title: 'Jalna pattern' for teachers' online pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.