...तर मंत्रालयात साप सोडू; आमदार बच्चू कडू यांचा इशारा
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: August 9, 2023 05:28 PM2023-08-09T17:28:17+5:302023-08-09T17:29:36+5:30
शासनाविरोधात ‘प्रहार’चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जन एल्गार
अमरावती : शेतमालास भाव देण्याची याच काय कोणत्याही शासनाची औकात नाही, शेतमजुराला साप चावला तर पैसे मिळत नाहीत, कृषी विभागाचे सचिव त्यामध्ये आडकाठी आणतात. आता १५ दिवसात निर्णय न झाल्यास मंत्रालयात साप सोडू, सापाला जात, धर्म समजत नाही, असा निर्वाणीचा इशारा माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी शासनाला दिला.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आ. बच्चू कडू व आ. राजकुमार पटेल यांच्या नेतृत्त्वात बुधवार या क्रांतिदिनी शेतकरी, शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट जन एल्गार मोर्चा काढण्यात आला. या कार्यालयासमोर पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर आ. कडू यांनी संबोधित केले.सरकारमध्ये असल्यानंतर मोर्चा काढू नये, असे कुठल्या घटनेमध्ये लिहिले आहे का, असा सवाल त्यांनी केला. जनसामान्याचा आवाज बनण्याचे काम आपण केले आहे. यासाठी पाच किमी अंतर पायदळ चालत हा मोर्चा काढण्यात आल्याचे ते म्हणाले.