र्विन चौकात जनसागर लोटला : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
By Admin | Published: April 15, 2016 12:15 AM2016-04-15T00:15:11+5:302016-04-15T00:15:11+5:30
मानव मुक्तीचे प्रणेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंत्युत्सव गुरुवारी विविध सामाजिक संघटना, ...
अमरावती : मानव मुक्तीचे प्रणेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तरी रौप्य महोत्सवी जयंत्युत्सव गुरुवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांद्वारे जल्लोषात साजरा करण्यात आला. इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला होता.
बुधवारी मध्यरात्री १२ वाजता येथील इर्विन चौक, बडनेरा येथील अशोकनगरातील पुतळा परिसरात फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या गजरात तसेच ‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा’ अशा गगनभेदी जयघोषात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. पुढे गुरूवारी दिवसभर महामानवाला आदरांजली अर्पण करण्याकरिता अनुयायांची रीघ लागली होती. इर्विन चौकात रिपाइं (गवई गट) च्यावतीने १२५ किलो वजनाचा केक कापण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त बुधवारी रात्रीपासूनच इर्विन चौकात आबालवृध्दांनी गर्दी केली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे समन्वयक किशोर बोरकर यांच्या पुढाकाराने सावलीसाठी कॅरिडोर तयार करण्यात आला होता. या कॅरिडोरला लागूनच बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित छायाचित्रे, प्रतिमा, गौतम बुद्धांच्या प्रतिमा, हार आणि फुलांची दुकाने लक्ष वेधून घेत होती. याठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, संत कबीर आदी समाज प्रबोधनकारांच्या विचारांचे ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होते. पंचशील, निळे झेंडे, गौतम बुद्धांसह आंबेडकरांच्या प्रतिमांची मोठी विक्री झाली. बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्धांची चित्रे अंकित असलेल्या माळा, लॉकेट, साखळी, हँडबेल्ट, मूर्ती आदी साहित्याचीदेखील रेलचेल होती.
बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत, यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळे तसेच विविध राजकीय पक्षांनी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी पाणी, सरबत तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते. बसपाद्वारे बाबासाहेबांना अभिवादन केले. एकता रॅली आयोजन समितीच्यावतीने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते, तर अध्यक्षस्थानी जैन संघटनेचे सुदर्शन गांग होते. स्वागताध्यक्षपदी संगीता शिंदे होत्या. यावेळी अतिथी म्हणून आ. श्रीकांत देशपांडे, आ. रवि राणा, प्रभारी कुलगुरू विलास सपकाळ, जिल्हाधिकारी किरण गित्ते, रिपाइंचे नेते राजेंद्र गवई, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, संजय खडसे, राजू नन्नावरे, गोविंद कासट, सुरेखा नन्नावरे, पुरुषोत्तम हरवानी, एम. ए. काबरा उपस्थित होते. गायक मोहन इंगळे यांच्यासह सूरज जवळकर, मुश्ताक भाई यांनी बुद्ध-भीमगीते सादर केली. आंबेडकर आयुर्वेद मेडिकोज विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाच्या चमुने शिबिरातून रूग्णांची तपासणी केली. (प्रतिनिधी)