अंबा फेस्टिवलनिमित्त ‘जाणता राजा’
By admin | Published: August 25, 2016 12:09 AM2016-08-25T00:09:23+5:302016-08-25T00:09:23+5:30
येथील अंबा फेस्टिवलचे हे दशकपूर्ती वर्ष असल्यामुळे २ ते १० आॅक्टोंबर या कालावधीत...
सहा दिवस नि:शुल्क प्रवेश : मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
अमरावती : येथील अंबा फेस्टिवलचे हे दशकपूर्ती वर्ष असल्यामुळे २ ते १० आॅक्टोंबर या कालावधीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित राजा शिव छत्रपती प्रतिष्ठान, पुणे निर्मित 'जाणता राजा' या महानाट्याचे सलग सहा दिवस नि:शुल्क प्रयोग आयोजित करण्यात आले आहे.
स्थानिक विभागीय क्रीडा संकुलावर होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन २ आॅक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केले जाईल. सहा दिवसांच्या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, ना. अनंत गीते, ना. सुधीर मुनगंटीवार, खा. रावसाहेब दानवे, खा. अशोक चव्हाण, खा. सुप्रिया सुळे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. १० आॅक्टोबर रोजी नवमीच्या दिवशी महानाटयाचा समारोप होईल.
अंबा फेस्टिवलच्या दशकपूर्ती निमित्त हे महानाट्य सुमारे २ लक्ष लोकांना नि:शुल्क दाखवले जाणार आहे. या माध्यमातून शिवाजी महाराजांचे जीवनकार्य नव्या पिढी समोर आणण्याचा यामागे उद्देश आहे. ५ मजली भव्य, फिरता रंगमंच,२०० हून अधिक कलावंत, आतषबाजी, दिंडी, लावणी, पोवाडा, कव्वाली, युद्ध, घोडे, उंट, बैलगाड्या, आकर्षक प्रकाशयोजना, अत्याधुनिक ध्वनिक्षेपण अशा असंख्य वैशिष्टयांनी सजलेले हे महानाट्य आहे. या महानाट्यात १०० स्थानिक कलावंतांना अभिनयाची संधी दिली जाईल. या महानाटयाच्या प्रचारार्थ विदर्र्भस्तरीय निबंध, वक्तृत्व व चित्र रंगवा स्पर्धा अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
७ आॅक्टोबर रोजी या महानाटयाचा शेवटचा प्रयोग होईल. घटस्थापनेच्या दिवशी अंबा फेस्टीवलच्या दशकपूर्ती निमित्त विक्रमी महारांगोळी काढण्याचा संकल्प ट्रस्टने केला आहे.त्यानंतर ८ ते १० आॅक्टोबर असे तीन दिवस हेल्थ एक्स्पो, चष्मे वाटप व विविध रोग निदान शिबीर, सुदृढ बालक स्पर्धा व्यंगचित्र प्रदर्शन, रोलर स्केटिंग स्पर्धा, अंबा देवी यात्रेत फराळाची खिचडी वाटप, रक्तदान असे कार्यक्रम आयोजिले आहेत.दशकपूर्ती समारोहासाठी गठीत केलेल्या स्वागत समितीच्या अध्यक्षपदी खा. आनंदराव अडसूळ आहेत. ना.प्रवीण पोटे, ना.रणजीत पाटील, आ. सुनील देशमुख, आ. प्रकाश पाटील भारसाकळे, आ. वीरेंद्र जगताप, आ. अनिल बोन्डे, आ. यशोमती ठाकूर, आ. श्रीकांत देशपांडे, आ. रमेश बुंदीले, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. राजेंद्र पाटणी, आ. हरीश पिंपळे, आ. अशोक उईके, महापौर रिना नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अरुण अडसड, सुलभा खोडके,रावसाहेब शेखावत, संजय बंड, नितीन धांडे आदी सदस्य आहेत.