जानेवारीत महापालिकेची ‘स्वच्छ’ परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:53 PM2017-11-29T22:53:31+5:302017-11-29T22:53:53+5:30

देशातील ४,०४१ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जानेवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला सामोरे जात आहेत. ४ हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी पूर्वतयारीने वेग घेतला आहे.

In January, 'clean' examination of municipal corporation | जानेवारीत महापालिकेची ‘स्वच्छ’ परीक्षा

जानेवारीत महापालिकेची ‘स्वच्छ’ परीक्षा

Next
ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१८ : पूर्वतयारीला वेग; स्वच्छतागृह उभारणीवर भर

आॅनलाईन लोकमत
अमरावती : देशातील ४,०४१ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जानेवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला सामोरे जात आहेत. ४ हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी पूर्वतयारीने वेग घेतला आहे. शहरात स्वच्छतेच्या मुद्द्यावर अहमहमिका लागली आहे. अमरावती महापालिकेने त्यासाठी मराठी अभिनेता भारत गणेशपुरे यांना ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर नेमून लोकसहभागाला साद घातली आहे.
सन २०१७ च्या जानेवारीत झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात अमरावती तब्बल २३१ व्या क्रमांकावर पिछाडल्याने यंदा ती नामुष्की टाळण्यासाठी प्रशासन व पदाधिकारी हातात हात घालून कामाला लागले आहेत.
४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत देशभरातील ४,०४१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले आहे. केंद्राच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या अखत्यारितील काऊंन्सिल आॅफ इंडियाचे पथक शहरा-शहरांत स्वच्छतेचे सर्वेक्षण करणार आहे. स्वच्छताविषयक ७१ बाबींवर हे स्वच्छ सर्वेक्षण होणार असून, राज्य आणि विभागीय स्तरावर शहरांचे गुणाांकन केले जाईल. २०१८ मध्ये होणारे हे तिसरे स्वच्छ सर्वेक्षण आहे. यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात ४३४ शहरांनी सहभाग घेतला. ही परीक्षा दोन हजार गुणांची होती. स्वच्छतेच्या माध्यमातून गरिबी व आरोग्याच्या प्रश्न समस्येवर मात करण्यासाठी केंद्राने हा महत्त्वाकांक्षी प्रयोग हाती घेतला आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतागृह पुरविण्यासह घनकचरा व्यवस्थापन, विलगीकरण, प्रक्रिया आणि कचरा संकलन हे घटक स्वच्छ सर्वेक्षणात अंतर्भूत आहेत. संपूर्ण शहर हगणदरीमुक्त करून घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविणाºया शहरांना पुरस्कारार्थ प्रोत्साहन निधी देऊन गौरविण्यात येईल. त्यादृष्टीने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत प्रशासन कामाला लागले आहेत. वैयक्तिक शौचालयांसह सार्वजनिक, सामुदायिक स्वच्छतागृहांची उभारणी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा विलगीकरण आणि स्वच्छतेसाठी अ‍ॅप कार्यान्वित करण्यासोबतच स्वच्छतेविषयक मोहीम, अभियान व जनजागृती हाती घेण्यात आली आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया १४०० गुणांच्या
जानेवारी-फेब्रुवारी २०१८ मध्ये होऊ घातलेल्या चार हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. नागरी स्थानिक संस्थांनी स्वच्छतेविषयक कसे कामकाज केले, त्याबाबतच्या प्रतिक्रियांवर १४०० गुण अवलंबून आहेत. याशिवाय प्रत्यक्ष निरीक्षणाला १२०० गुण, तर स्वच्छतेविषयक सेवास्तरावरील प्रगतीसाठी १४०० गुण आहेत.

जानेवारी २०१८ मध्ये तिसरे स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले आहे. या चार हजार गुणांच्या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी महापालिकेने पूर्वतयारीला वेग दिला आहे.
- हेमंतकुमार पवार,
आयुक्त, महापालिका

Web Title: In January, 'clean' examination of municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.