अखेर जयश्रीला मृत्यूने गाठलेच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2017 12:29 AM2017-05-22T00:29:12+5:302017-05-22T00:29:12+5:30
सासरच्यांच्या अमानवीय छळाची बळी ठरलेल्या जयश्रीने मृत्युला तब्बल वर्षभर थोपवून धरले. मात्र,
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सासरच्यांच्या अमानवीय छळाची बळी ठरलेल्या जयश्रीने मृत्युला तब्बल वर्षभर थोपवून धरले. मात्र, गलितगात्र झालेल्या आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या जयश्रीचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. जयश्री जीवनाची लढाई हरली असली तरी यानिमित्ताने समाजासमोर आलेली महिला अत्याचाराची काळी बाजू भयावह आहे.
सन २०१६ च्या सुरूवातीला जयश्री दुधे अत्याचारप्रकरण समोर आले होते आणि अवघे समाजमन हेलावले होते. लोकमतनेच जयश्रीवरील अत्याचाराला वाचा फोडली होती. अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा येथील जयश्रीचा विवाह नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील युवकाशी झाला होता. तिला दोन मुले, मुलगी अशी अपत्ये आहेत. मात्र, काही वर्षांनी तिच्या पतीचे अपघाती निधन झाले. आधीच आजारी असलेली जयश्री आणखीच खचली. मात्र, तिच्या या शारीरिक व मानसिक दौर्बल्याचा फायदा घेऊन सासरच्या मंडळींनी जयश्रीवर अत्याचार सुरू केले. तिला त्यांनी तब्बल वर्षभर घरात डांबून ठेवले. तिच्यावर अनन्वित अत्याचार केलेत. अक्षरश: तिची उपासमारही केली. ही बाब कुऱ्हा येथे तिच्या वडिलांना माहिती पडताच त्यांनी जयश्रीला माहुरहून अमरावतीला आणले.
येथे आधी तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान ‘लोकमत’ने हा भयंकर प्रकार लोकदरबारात मांडला. त्यानंतर अनेक समाजसेवी संघटना सुद्धा जयश्रीच्या बाजुने उभ्या ठाकल्यात. आ. यशोमती ठाकूर यांनी जयश्रीची भेट देऊन तिला ‘ऐश्वर्या राय’ असे संबोधून तिला धीर दिला होता. पश्चात जयश्रीला पारश्री हॉस्पिटलचे डॉ. राठी यांनी उपचारासाठी दत्तक घेतले. तिच्यावर तेथे महिनाभर उपचार झाले. पश्चात तिचे वडील तिला कुऱ्हा येथे घेऊन गेले.
कुऱ्हा येथील पीएचसीमध्ये तिच्यावर तब्बल महिनाभर अद्ययावत उपचार करण्यात आलेत. त्यानंतर तिच्या वडिलांसमवेत ती कुऱ्हा येथील घरी राहात होती.
वडिलांची परिस्थिती जेमतेमच असल्याने कसाबसा त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, आधीच आजारी असलेली जयश्री अधिक तग धरू शकली नाही आणि तिने शनिवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.
संघर्ष संपला : सासरच्यांच्या अमानवीय छळाची कहाणी
आईच्या मृत्युचा आघात
४जयश्रीवर पारश्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिची प्रकृती हळूहळू सुधारत होती. त्यामुळे सगळ्यांनाच उभारी आली होती. जयश्री सुद्धा खूश होती. जगण्याची ईच्छा तिच्या मनात निर्माण झाली होती. मात्र, त्याच दरम्यान तिच्यावर आणखी एक आघात झाला. जयश्रीच्या आईचा मानसिक तणावामुळे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जयश्री अगदीच पोरकी झाली.
अंत्यसंस्काराला मुले आली पण...
४जयश्रीचा मृत्यू जणू सगळ्यांनी गृहितच धरलेला. सासरच्यांनी तर तिला जिवंतपणीच मरणयातना दिलेल्या. जयश्रीचे सासू-सासरे अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते. मात्र, काही नातलगांसह तिची तिन्ही मुले मात्र अंत्यसंस्काराला उपस्थित होती. आईच्या मृत्युचा शोक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असला तरी बरीच वर्षे आईपासून विलग राहिल्याने मुले देखील संभ्रमित असल्याचे जाणवत होते.
सासरच्यांनी मागितले पोलीस संरक्षण
४अंत्यसंस्कारासाठी माहुरहून आलेल्या जयश्रीच्या सासरच्या मंडळींनी कुऱ्हा येथे पोहोचताच आधी कुऱ्हा पोलीस ठाणे गाठून पोलीस संरक्षणाची मागणी केली. मागील प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, हा त्यांचा उद्देश होता. मात्र, गावातील समाजसेवी युवक संतोष धुमाळे, मनीष पोकळे, मंगेश भोगले, संतोष भैसे, बंटी बगरे व आमले यांनी अंत्यसंस्कार शांततापूर्ण वातावरणात पार पाडले.