जामठीच्या शिक्षकांनी जपला सावित्रीचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 10:04 PM2019-01-02T22:04:34+5:302019-01-02T22:04:52+5:30
पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान भटकंती करणाऱ्या मेंढपाळाच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेल्या जामठी येथील शाळेचे रूपडे पालटले आहे. झोपडीत सुरू झालेल्या या शाळेच्या माध्यमातून अक्षरे गिरविण्यापासून कोसोदूर असलेल्या येथील चिमुकल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्कार्य येथील शिक्षकांनी केले. त्यांनी सावित्रीचा वसा जपला.
संजय जेवडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान भटकंती करणाऱ्या मेंढपाळाच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेल्या जामठी येथील शाळेचे रूपडे पालटले आहे. झोपडीत सुरू झालेल्या या शाळेच्या माध्यमातून अक्षरे गिरविण्यापासून कोसोदूर असलेल्या येथील चिमुकल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्कार्य येथील शिक्षकांनी केले. त्यांनी सावित्रीचा वसा जपला.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जामठी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ही कहाणी. गावाची लोकसंख्या २२५ आणि कुटुंबसंख्या ७५ च्या आसपास. येथील ९५ टक्के नागरिक धनगर समाजाचे असून, मेंढीपालन हा त्यांच्या उपजीविकेचा मोठा आधार. त्यामुळे पाठीवर बिºहाड घेऊन गावोगावी फिरणे आलेच. मुलाबाळांना घेऊन चराईसाठी जागा मिळेल तेथे त्यांचा बेडा असतो. मग त्यांच्या मुला-मुलींना कुठले शिक्षण? मात्र, शिक्षकांनी त्यावरही उपाय शोधून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. २०१० मध्ये येथे जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळेला सुरुवात झाली. इमारत नसल्याने गुरांचा गोठा हीच शाळेची इमारत होती. त्यावेळी हजेरीपटावर मुलांची संख्या ४५ असली तरी प्रत्यक्षात १९ विद्यार्थी शाळेत दिसायचे. तत्कालीन शिक्षक व विद्यमान मुख्याध्यापक उमेश मारोतराव शिंदे यांनी शोध घेतला तेव्हा बहुतांश मुले बेड्यावर आढळले. त्यांनी या पालकांना विश्वास दिला आणि घरी असलेल्या आजी-आजोबांच्या भरवशावर त्यांना सोडण्याची विनंती केली. त्यांची धडपड पाहून पालकांना शिक्षणाचे महत्त्व कळले. शिंदे हे बेड्यावरून या मुलांना शाळेत घेऊन आले आणि त्यावेळी या मुलांच्या राहण्याची, भोजनाची, आरोग्याची जबाबदारीही स्वीकारली. यासाठी शाळेतील सहायक शिक्षक अलका राजेंद्र नेरकर यांची त्यांना मोलाची साथ लाभली.
शाळाबाह्य असलेली ही मुले आता शिक्षणाच्या प्रवाहात आली असून, येथील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच डिजिटल क्लासरूमसारख्या आधुनिक शैक्षणिक सुविधेसोबत शिक्षण घेत आहेत.
आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाºया विद्यार्थ्यांप्रति शिक्षकांची तळमळ हेच जामठीच्या शाळेचे यश आहे. या शिक्षकांमुळेच आजही सावित्रीबार्इंचा वसा जपला जात आहे.
- प्रवीण खांडेकर, गटशिक्षणाधिकारी, पं.स.
अनेक पिढ्यांपासून रानोरान फिरत तेथेच वास्तव्य करीत होतो. पण, या शाळेमुळे आमची मुले शिकू लागली आहेत. येथील शिक्षक घरोघरी फिरून मुले शाळेत आणतात आणि त्यांची सर्व काळजी घेतात.
- सुखाभाऊ टेळे, माजी सरपंच, जामगाव (जामठी)