जावईबापूंचा पहिला दसरा पाच हजारांत, सोने पोहोचले 49 हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 05:00 AM2021-10-15T05:00:00+5:302021-10-15T05:01:00+5:30
दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. पण, जावईबापूंचा पहिलाच दसरा असेल, तर खऱ्याखुऱ्या सोन्याचे पानदेखील देण्याची प्रथा आहे. गतवर्षी मार्चपासून उद्भवलेल्या कोरोनामुळे हाताबाहेर गेलेली, सामान्यांसह व्यावसायिकांना हतबल करून सोडणारी स्थिती आता नाही. जनजीवन, व्यापार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. त्याचा सकारात्मक परिमाण सराफा बाजारावरील ग्राहकीवर झाला आहे.
प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, जीडीपीवर होणारा परिणाम आणि आर्थिक अनिश्चितता हे घटक पुन्हा एकदा सोन्याच्या दरवाढीस पोषक वातावरण निर्माण करणारे ठरले आहे. दोन महिन्यात सोन्याचा भाव चार हजारांनी वाढला. गुरुवारी सराफा बाजारात सोन्याचा दर प्रतितोळा ४९ हजारांवर गेला. चांदी प्रतिकिलो ६२ हजार रुपयांपर्यंत पोहोचली. दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे.
दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. पण, जावईबापूंचा पहिलाच दसरा असेल, तर खऱ्याखुऱ्या सोन्याचे पानदेखील देण्याची प्रथा आहे. गतवर्षी मार्चपासून उद्भवलेल्या कोरोनामुळे हाताबाहेर गेलेली, सामान्यांसह व्यावसायिकांना हतबल करून सोडणारी स्थिती आता नाही. जनजीवन, व्यापार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. त्याचा सकारात्मक परिमाण सराफा बाजारावरील ग्राहकीवर झाला आहे.
अर्ध्या ग्रॅमचे पान २५००, एक ग्रॅम पान पाच हजारात
सराफा बाजारात अर्ध्या ग्रॅमच्या सोन्याच्या पानासाठी २५०० रुपये, तर एक ग्रॅमच्या सोन्याच्या पानासाठी सुमारे ४८०० ते पाच हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र, हौसेला व मानपानाला मोल नसल्याने या सुवर्णपानांची खरेदीदेखील जोरात सुरू आहे.
सराफा व्यापारी काय म्हणतात...
सोने बाजार सकारात्मक व समाधानकारक आहे. ग्राहकीदेखील चांगली आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा ४८ हजारांच्या घरात आहे.
- महेश वर्मा, माधुरी ज्वेलर्स
२४ कॅरेट सोन्याचा दर ४९,४७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर तोळ्याला ४५,७९० रुपये असा आहे. ग्राहकी उत्तम आहे. बाजारात रौनक आहे.
- पी.एन.गाडगीळ ॲन्ड सन्स
सोने बाजारात धूम
दोन महिन्यांपासून शहर संपूर्णत: अनलॉक झाले. जनजीवन पूर्वपदावर आले. व्यवसायदेखील पूर्ण जोमाने सुरू झाले आहेत. लागोपाठच्या लॉकडाऊनमुळे अनेकांना सोने खरेदीची हौस पूर्ण झाली नाही. विवाहाच्या वेळीदेखील अनेकांना लपून-छपून सोने खरेदी करावे लागले. आता मात्र सराफा बाजार पूर्ण क्षमतेने फुलला आहे. दसरा व दिवाळीच्या शुभपर्वावर सराफा झळाळला आहे.