घरकामासह वेटर, नर्स, चालकाला विदेशात नोकरीची संधी : सरकार देणार प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:16 AM2024-08-22T11:16:03+5:302024-08-22T11:18:30+5:30
Amravati : जर्मनी देशासोबत सामंजस्य करार, जिल्हास्तरावर पाच केंद्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जर्मनी येथील बाडेन, बुटेनबर्ग राज्याशी सामंजस्य करार केला आहे. यामध्ये परिचारिका, वैद्यकीय सहायक, प्रयोगशाळा यासह सुरक्षारक्षक, वाहनचालकांपासून वेटर्स, रंगारी, सुतार, गवंडी, प्लंबर्स अशा विविध क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाला विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विदेशी भाषेसह कुशल कौशल्याचे प्रशिक्षण, शिक्षण निःशुल्क दिले जाणार आहे.
युरोपीय देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन वुर्टेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. यानुषंगाने विविध क्षेत्रांतील १० हजार कुशल मनुष्यबळाचा पुरवठा टप्प्याटप्प्यात केला जाणार आहे, वेगवेगळ्ळ्या ३० क्षेत्रांतील व्यक्तींचा यामध्ये समावेश असेल. या क्षेत्रामध्ये कौशल्य असणाऱ्या व जर्मनीमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी विभागाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या लिंकवर नोंदणी करायची आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ जणांची निवड करून यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा विजा, पासपोर्ट शासन काढून देणार आहे.
यावर करा नोंदणी
शिक्षकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. (https://forms.gle/1Q32ByN wp9MnHmHc7) या संकेतस्थळावर शिक्षकांना नोंदणी करावी लागणार आहे. तर जर्मनीत रोजगारासाठी तरुण तरुणींची निवड केली जाणार आहे. याकरिता https://maa.ac.in/GermanyE mployment/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात पाच केंद्रे
जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हास्तरावर पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या पाचही केंद्रांवर सकाळ, संध्याकाळ अशा दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण वर्ग चालविले जाणार आहेत.
यांना विदेशात नोकरीची संधी
परिचारिका, वैद्यकीय सहायक, प्रयोगशाळा सहायक, दंतचिकित्सा सहायक, वीजतंत्री, वाहनचालक, सुरक्षारक्षक, हॉटेल व्यवस्थापक, स्वयंपाकी, रंगारी, गवंडी, सुतार, प्लंबर, वाहन दुरुस्ती, नळ जोडणी, केअर टेकर, अशा वेगवेगळ्या ३० क्षेत्रांतील व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे.
जर्मन भाषेचे मिळणार धडे
जर्मनी येथे काम करण्यासाठी प्रथम अट आहे ती भाषेची. त्यासोबतच राजशिष्टाचारास महत्त्व असून, त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रथम शिक्षकांना जर्मन भाषेचे धडे दिले जाणार आहेत. या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ज्यांची काम करण्याची इच्छा आहे, अशा शासकीय आणि अनुदानित शाळेतील शिक्षकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
२५ जणांना संधी पहिल्या टप्प्यात
जर्मन भाषा शिकविण्यासाठी जिल्हास्तरावर २५ विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे जिल्ह्यातील २५० जणांना प्रशिक्षण दिले जाईल.
"महाराष्ट्रातील विविध कौशल्य प्राप्त केलेल्या युवक-युवतींसाठी जर्मनीमधील बाडेन, बुटेनबर्ग या राज्यांत नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याकरिता एसीआरटी पुणे यांनी दिलेल्या वेबसाईटवर नोंदणी करावी, तसेच यामध्ये पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकविण्यासाठी सुलभक म्हणून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांना जर्मन भाषेच्या तज्ज्ञांकडून प्रथम धडे दिले जाणार आहेत."
-मिलिंद कुबडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती