संत्रावरील आयात शुल्क कमी करण्यासाठी नितीन गडकरींना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:09 AM2021-06-21T04:09:59+5:302021-06-21T04:09:59+5:30
फोटो - २०एएमपीएच०१ - कॅप्शन - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देताना इंडो-बांग्ला निऱ्यातदार संघटनेचे सचिव रमेश जिचकार. ...
फोटो - २०एएमपीएच०१ - कॅप्शन - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देताना इंडो-बांग्ला निऱ्यातदार संघटनेचे सचिव रमेश जिचकार.
अमरावती : विदर्भातील प्रमुख फळपिक संत्र्यांचा मोठा आयातदार बांगला देशात आहे. तेथील सरकारने अर्थसंकल्पामध्ये संत्र्यावरील आयात शुल्क वाढविल्याने संत्रा उत्पादकांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने याविषयीची दखल घ्यावी व आवश्यक तो पर्याय काढण्याची मागणी इंडो-बांग्ला संत्रा बागायतदार संघटनेद्वारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शनिवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.
बांगला देशात मुख्यत्वे वरूड, मोर्शी, अचलपूर, सौंसर, पांढुर्णा येथील संत्रा मंडीतून २४ ते २५ मे टन संत्रा निर्यात केला जातो. यंदा बांगला देशाच्या अर्थसंकल्पात पूर्वीच्या ३१ रुपये प्रतिकिलोने वाढ करून ३८ रुपये ९० पैसे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे २५ मे.टन संत्राफळावर किमान दोन लाखांची वाढ होणार आहे. बांगला देश सरकारने जून महिन्यापासून संत्राफळावरील वाढ न करण्याबाबत भारत सरकारचे वाणिज्य मंत्रालय, ॲपेडा यांनी दखल घेऊन आवश्यक ती प्रक्रिया करावी व संत्रा उत्पादक व संत्रा निर्यातदारांना न्याय द्यावा, अशी विनंती संघटनेद्वारे ना. गडकरी यांना करण्यात आली.
बॉक्स
१.५० पेक्षा जास्त मे.टन संत्राफळांची निर्यात
मृग व आंबिया बहराच्या १.५० ते १.७५ मे.टन संत्री निर्यात बांगला देशात केली जाते. आता आयात शुल्क वाढविल्यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने केंद्र शासनाने याची दखल घेण्याची मागणी इंडो बांगला संत्रा निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष सोनू खान, उपाध्यक्ष ताज खान, रमेश जिचकार यांनी ना, गडकरी यांना केली यावेळी विजय श्रीराव, अशोक कुबडे, अन्सारखान, पुंडलिकराव हरणे उपस्थित होते.