खरीप उद्ध्वस्त संयुक्त सर्वेक्षण, पंचनाम्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 01:40 AM2019-10-31T01:40:09+5:302019-10-31T01:41:19+5:30

यंदाच्या हंगामात पेरणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड राहिल्याने मूग, उडीद आदी अल्पावधीची पिके उद्ध्वस्त झालीत. सोयाबीनलादेखील मोड आली. यामधून शेतकरी सावरत नाही तोच संततधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता कापूस वेचणीचा व सोयाबीन सोंगणी अन् मळणीचा हंगाम असताना १८ ऑक्टोबरपासून सातत्याने पाऊस होत आहे.

Joint survey of Khyber, Panchanama orders | खरीप उद्ध्वस्त संयुक्त सर्वेक्षण, पंचनाम्याचे आदेश

खरीप उद्ध्वस्त संयुक्त सर्वेक्षण, पंचनाम्याचे आदेश

Next
ठळक मुद्देदहा दिवसांपासून अवकाळी : १.४५ लाख हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे १ लाख ४५ हजार ५३ हेक्टरमधील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे १ लाख ४७ हजार ९१९ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले.
यंदाच्या हंगामात पेरणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड राहिल्याने मूग, उडीद आदी अल्पावधीची पिके उद्ध्वस्त झालीत. सोयाबीनलादेखील मोड आली. यामधून शेतकरी सावरत नाही तोच संततधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता कापूस वेचणीचा व सोयाबीन सोंगणी अन् मळणीचा हंगाम असताना १८ ऑक्टोबरपासून सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे हे सोयाबीन जागेवरच थिजले. ज्यांनी सोंगणी केली, त्यांनी लावलेल्या गंजीमधील शेंगांना अंकुर फुटत आहेत. हीच स्थिती ज्वारीची आहे. कणसामधील दाण्यांचे बीजांकुरण होत आहे. कणसे काळी पडली आहेत. कापसाची बोंडे सडायला लागली आहेत, तर फुटलेल्या बोंडामधील कापूस ओला झाल्याने प्रथवारी खराब झालेली आहे. कापूस सडायला लागला आहे. यामधील सरकीलाच कोंब फुटायला लागले असल्याचे विदारक चित्र शेतशिवारात आहे.
जिल्हा कृषी विभागाद्वारे प्राथमिक नजरअंदाज अहवाल २९ ऑक्टोबरला जिल्हाधिकाºयांना सादर झाला. यामध्ये जिल्ह्यातील १६०६ गावांमध्ये सोयाबीन ९५ हजार ८९९ हेक्टर, कापूस ४१ हजार, ज्वारी ३१६३ हेक्टर, धान ३४६९ हेक्टर, तूर ७२० हेक्टर व १८३ हेक्टरमधील मका पिकाचे मोठे नुकसान या पावसाने झालेले आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ४५ हजार ५३ हेक्टरमधील खरीप पिकांना फटका बसलेला आहे. किमान १ लाख ४७ हजार ९२९ शेतकरी या अकाली संकटामुळे बाधित झालेले आहेत.

३३ टक्क्यांवर नुकसानाचे सर्वेक्षण
दहा दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहेत. या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. ग्रामसेवक, कृषिसहायक व तलाठी संयुक्त सर्वेक्षण व पंचनामे करून अहवाल सादर करणार आहेत. ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, अशा ठिकाणी संयुक्त सर्वेक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार कापणी केलेल्या, जमा करून ठेवलेल्या, कापणीस आलेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरीसह तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

७२ तासांच्या आत करा अर्ज
जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी काढणीच्या अवस्थेत आहेत. कपाशीची बोंडे परिपक्व झाल्याने फुटू लागली आहेत. ती आता सडायला लागली आहेत. कापून सुकत ठेवलेले सोयाबीनदेखील ओले झाले आहे. पावसाने अवेळी हे नुकसान झाले आहे. पीक विमा क्षेत्र जलमय होणे व कापणी केलेल्या पिकांचे काढणीपश्चात नुकसान या बाबींसाठी वैयक्तिक पंचनामे करुन विमादारक शेतकºयांना भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यासाठी पिक नुकसानीचा सुचना फार्म भरुन लगतच्या कृषी कार्यालयाकडे देणे महत्वाचे आहे.

टोल फ्री क्रमांकावर द्यावी माहिती
पिकांच्या नुकसानाची माहिती १८००११६५१५ या टोल फ्री क्रमांकावर देणे आवश्यक आहे. पावसामुळे शेती जलमय होऊन उभ्या पिकांचे किंवा कापणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्यास ७/१२ व विमा हप्ता भरल्याच्या पुराव्यासह विमा कंपनी, तालुका, जिल्हा कार्यालय, विमा हप्ता भरलेली बँक, महसूल वा कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाºयांकडे कळविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

Web Title: Joint survey of Khyber, Panchanama orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.