कुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन प्रवास
By Admin | Published: February 5, 2017 12:11 AM2017-02-05T00:11:18+5:302017-02-05T00:11:18+5:30
नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यातील पापळनजीकच असलेल्या हिवरा (मुरादे) येथील नाथजोगी समाजाच्या ४९ कुटुंबीयांना २८ वर्षांपासून कुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन जगावे लागत आहे.
कधी मिळणार हक्काचे घरकूल ? : हिवरा मुरादे येथील नाथजोगी कुटुंबीयांची व्यथा
नंदकिशोर इंगळे पापळ
नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यातील पापळनजीकच असलेल्या हिवरा (मुरादे) येथील नाथजोगी समाजाच्या ४९ कुटुंबीयांना २८ वर्षांपासून कुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन जगावे लागत आहे. हक्काच्या घरकुलाची आशा बाळगणाऱ्या या नाथजोगी कुटुंबीयांना दोन तपाच्या प्रतीक्षेनंतरही निवासाची सोय नसणे ही शोकांतिका आहे. हक्काचे घरकूल मिळणार की, बेघरच राहावे लागणार, असा प्रश्न या कुटुंबीयांसमोर निर्माण झाला आहे.
४० कुटुंबीयांच्या वस्तीत २०० लोकांची राहुटी असलेल्या नाथजोगी बांधवांना अत्यंत दारिद्र्याचे जीवन जगावे लागत आहे. २८ वर्षांपासून हिवरा (मुरादे) येथे या नागरिकांचे वास्तव्य आहे. या वस्तीतील नागरिक गावोगावी भटकंती करतात, तर महिला गवताच्या पेंढ्या गोळा करून आपल्या कुटुंबीयांची कशीबशी उपजिवीका भागवितात. शासकीय योजना काय आहेत, त्याचा लाभ कसा घ्यायचा, या बाबींपासून या वस्तीतील नागरिक अनभिज्ञ आहेत. या वस्तीतील नागरिकांचा दोन तपापासून फक्त राजकारणापुरताच वापर झालेला आहे. मतदान कार्डाव्यतिरिक्त या नागरिकांकडे दुसरे कुठलेही शासकीय कार्ड नाहीत. साधी विद्युत व्यवस्था या वस्तीत नाही. रस्त्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात ही वस्ती संपूर्ण चिखलमय राहते.
शिक्षणाचा त्या वस्तीतील नागरिकांना साधा गंधही नाही. या वस्तीतील नागरिक सुशिक्षित नाही. या वस्तीत ४० ते ५० लहान मुले आहेत. त्यांची शिक्षणापासून परवड होत आहे. त्या वस्तीतील फक्त ५ मुले शाळेत जातात. शिक्षण महर्षींच्या परिसरात शिक्षणाची विदारक स्थिती असणे, ही फार मोठी शोकांतिका आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
५० वर्षांपासून शाहिरी करणाऱ्यांची वाणी स्तब्ध
आमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता या वस्तीत एक भयाण वास्तव नजरेस आले. या झोपडीत एक शाहीर राहत असून ५० वर्षांपासून समाज प्रबोधन करून आपल्या शाहीरीतून समानतेचा संदेश देणारा बाळू शंकर पवार हा शाहीर याच झोपडीत राहत आहे. दोन तपाच्या कालखंडात आमच्यासाठी निवाऱ्याची साधी व्यवस्थासुद्धा झालेली नाही. जीवन जगताना आमची फार मोठी अवहेलना होत आहे. एकीकडे आम्ही जनतेला समानतेचा संदेश देतोय. परंतु आम्हाला साधी निवाऱ्याचीही सोय नाही. हे आमचे उघड्यावरच जीवन समाज व्यवस्था सांभाळणाऱ्यांना नजरेस येत नाही का? ही खंत व्यक्त करताना या शाहिराचे डोळे पाणावले अन् त्याची वाणी स्तब्ध झाली.