'शकुंतला"च्या प्रवासाला 'ब्रेक'; 2 मेपासून फेरी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 07:57 PM2019-05-03T19:57:37+5:302019-05-03T19:58:18+5:30
सुरक्षा व डागडुजीचे काम पूर्णत्वास न गेल्याने अचलपूर ते मूर्तिजापूर अशी धावणारी शकुंतला रेल्वे २ मेपासून बंद करण्यात आली आहे.
दर्यापूर (अमरावती) : सुरक्षा व डागडुजीचे काम पूर्णत्वास न गेल्याने अचलपूर ते मूर्तिजापूर अशी धावणारी शकुंतला रेल्वे २ मेपासून बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ही रेल्वेगाडी बंद राहील, असा फलक स्थानिक रेल्वे फलाटावर लागला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून धावत असलेल्या शकुंतला रेल्वेगाडीचे वर्तमान अस्वस्थ करणारे आहे. अशातच आठवड्यापूर्वी झालेल्या एका अपघाताचे निमित्त करून ही रेल्वे कायमची बंद करण्याचा घाट तर रचला जात नसावा ना, अशी शंका दर्यापूरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. या रेल्वेगाडीत कुठलीही सुधारणा न करता क्रमाक्रमाने तिचा प्रवास थांबविण्याचा प्रयत्न होत आहे. सुरुवातीला दोन फेऱ्यांच्या जागी एक फेरी करण्यात आली. नंतर छोटे थांबे बंद केले. रेल्वे फाटक मानवविरहित केले. मागोमाग बनोसा, दर्यापूर व अंजनगाव स्थानक बंद केले. सहा डब्यांची शकुंतला रेल्वे ही आता तीन डब्यांवर आली आहे.
मूर्तिजापूर-यवतमाळ फेरी बंद
शकुंतला रेल्वेचाच भाग असणारी, मूर्तिजापूर ते यवतमाळ धावणारी फेरी दोन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. ती फेरी सुरू करण्याबाबत कुठल्याही हालचाली होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेली नाही. अचलपूर ते यवतमाळ या १९० किमी रेल्वे मार्गावरील वाहतूक आता बंद झाली आहे.
''लाकडी स्लिपर जळाल्याने शुकंतला रेल्वेची वाहतूक वरिष्ठांच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आली. कामे पूर्ण झाली आहेत. वरिष्ठांचे आदेश प्राप्त होताच रेल्वे पूर्ववत सुरू करू.''
- मनोज त्रिपाठी, (सहाय्यक मंडळ अभियंता, रेल्वे विभाग)