मातृत्वाचा आनंद खर्चिक ; जिल्ह्यात निम्म्या प्रसूती ‘सिझेरियन’

By उज्वल भालेकर | Published: June 2, 2024 08:23 PM2024-06-02T20:23:55+5:302024-06-02T20:24:11+5:30

वर्षात ३२ हजार १६० प्रसूतींत ४५ टक्के सिझेरियन

joy of motherhood is costly; Half of deliveries in the district are 'Cesarean' | मातृत्वाचा आनंद खर्चिक ; जिल्ह्यात निम्म्या प्रसूती ‘सिझेरियन’

मातृत्वाचा आनंद खर्चिक ; जिल्ह्यात निम्म्या प्रसूती ‘सिझेरियन’

अमरावती: गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट प्रसूतीच्या टप्प्यामध्ये सिझेरियन शस्त्रक्रियांचा पर्याय स्वीकारावा, असा वैद्यकीय सल्ला दिला जातो; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सिझेरियन प्रसूतीच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जिल्ह्यामध्ये २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ३२ हजार १६४ महिलांची प्रसूती झाली. यामध्ये १४ हजार ४०० म्हणजेच ४५ टक्के महिलांची सिझेरियन करण्यात आल्याची आकडेवारी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे.

कोणत्याही लोकसंख्येमध्ये नैसर्गिक प्रसूती या सिझेरियन प्रसूतीपेक्षा अधिक असतात. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी सिझेरियन शस्त्रक्रियांचे प्रमाण हे वर्षाला दहा ते पंधरा टक्के इतके होते; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सिझेरियनमध्ये वाढ झाली आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या प्रसूतीच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. प्रसूतीदरम्यान असणारी वैद्यकीय गुंतागुंत अशा अनेक कारणांमुळे या प्रकारच्या सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढत असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात. त्याचबरोबर उशिरा होणारे विवाह, वाढत्या वयातील गर्भधारणा, नैसर्गिक प्रसूतीमध्ये होणाऱ्या प्रसवयातना टाळण्यासाठी सिझेरियन प्रसूतीचा निर्णय घेतला जातो. जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ३२ हजार १६४ महिलांची प्रसूती झाली. यामध्ये १७ हजार ७६४ नैसर्गिक, तर १४ हजार ४०० प्रसूती सिझेरियन झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

या कारणांमुळे होते सिझेरियन
गर्भवती माता किंवा तिच्या बाळाला धोका असेल तर सिझर केले जाते. सऱ्हास सिझरमध्ये बाळाच्या गळ्याला नाळेचे वेढे असणे, गर्भाशयातील पाणी कमी होणे, बाळाने पोटात शी केली, तसेच बाळाचे ठोके अनियमित असल्याची कारणे देऊन सिझर केले जाते. याबाबतीत डॉक्टरांमध्येही तर्क-वितर्क आणि मतभेद आहेत.

खासगी रुग्णालयांत सिझेरियनवर भर
शासकीय रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयांत सिझेरियनचे प्रमाण हे अधिक आहे. तसेच खासगी रुग्णालयातील सिझेरियनचा खर्चही ३० ते ५० हजारांपर्यंतचा आहे. अनेक कुटुंबांसाठी हा खर्च परवडणारा नाही; परंतु आई आणि बाळाच्या सुरक्षेसाठी सिझेरियन करण्यावर अधिक भर दिला जातो.

वर्षभरात ३२ हजार ३९४ बाळांचा जन्म
१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ३२ हजार १६४ महिलांची प्रसूती झाली. या मातांनी एकूण ३२,३९४ बाळांना जन्म दिला. यामध्ये १६ हजार ८२६ मुले, तर १५ हजार ५६८ मुलींचा जन्म झाला असून, काही मातांनी जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.

Web Title: joy of motherhood is costly; Half of deliveries in the district are 'Cesarean'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.