तरुणाईचा जल्लोष, उत्साह... युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 11:22 PM2022-10-12T23:22:17+5:302022-10-12T23:23:18+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे बुधवारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात थाटात उद्घाटन करण्यात आले. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाला पहिल्यांदाच महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे बुधवारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात थाटात उद्घाटन करण्यात आले. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाला पहिल्यांदाच महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे.
कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभाला आमदार सुलभा खोडके, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे प्रमुख पाहुणे, कुलसचिव तुषार देशमुख, मुख्य संयोजक प्राचार्य रामेश्वर भिसे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक राजीव बोरकर, महोत्सवाचे समन्वयक सुभाष गावंडे, सहसमन्वयक वैशाली देशमुख, युवा महोत्सव निवड समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल गवई, सदस्य जयश्री वैष्णव, निखिलेश नलोडे, रेखा मग्गीरवर, गजानन केतकर प्रामुख्याने उपस्थित होते.
जग संकुचित होत चालले : हर्षवर्धन देशमुख
आपण अजूनही कोविडच्या छायेतून बाहेर निघालो नसून आभासी दुनियेमुळे एकमेकांपासून दूर जात आहोत. जग संकुचित होत चालले आहे, आपण स्वतःच्या व परिवाराच्या पलीकडे बघायला तयार नाही. सर्व करतो; पण काहीच करीत नाही, अशी आपली अवस्था असून, यातून बाहेर काढण्यासाठी युवा महोत्सवाची गरज असल्याचे प्रतिपादन उद्घाटक आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले.
विद्यापीठाचे कर्तव्य माणूस घडविणे : डॉ. दिलीप मालखेडे
विद्यापीठाचे काम केवळ शिक्षण देणे नसून माणसे घडविणे हे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी आवश्यक आहे. अमरावती विद्यापीठ हे काम सातत्याने करीत असल्याचे प्रतिपादन उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले. केवळ विद्यापीठच नव्हे, तर प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी एक दालन असावे, तेथे विद्यार्थ्यांचा कायम सराव चालावा, याची आज गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रिकेतून गाडगेबाबांचे छायाचित्र गायब
विद्यापीठाच्या कार्यक्रम पत्रिकेत संत गाडगेबाबा यांचे छायाचित्र नाही, शिवाय विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी प्रास्ताविकात संत गाडगेबाबा यांचा उल्लेख टाळला. ही ‘ॲलर्जी’ का, असा सवाल उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोरील गाडगेबाबांची दशसूत्री हटविल्याचा मुद्दा गाजला होता.
लोकनृत्य, एकांकिका, वादविवाद स्पर्धेने मने जिंकली
येथील पीडीएमसी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कलावंत विद्यार्थ्यानी लोकनृत्याचे बहारदार सादरीकरण केले. बुधवारी युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी लोकनृत्यानंतर एकांकिका, समूहगान, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कोलाज कला प्रकार, पाश्चिमात्य वाद्य संगीत, एकल गायन अशा विविध कला प्रकाराचे कलावंत विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.