न्यायाधीश झाले साक्षीदार अन् वकील वऱ्हाडी
By admin | Published: February 14, 2017 12:10 AM2017-02-14T00:10:07+5:302017-02-14T00:10:07+5:30
विविध प्रकरणांत न्यायनिवाडा करीत शिक्षा तर कुठे निर्दोष सोडणाऱ्या न्यायाधिशांनाच चक्क साक्षीदार ...
साडी-चोळी भेट : विभक्त झालेल्या आठ जोडप्यांचे झाले मिलन
परतवाडा : विविध प्रकरणांत न्यायनिवाडा करीत शिक्षा तर कुठे निर्दोष सोडणाऱ्या न्यायाधिशांनाच चक्क साक्षीदार आणि वकिलांना वऱ्हाडी होण्याचा अद्भूत सुखद आणि दोन परिवारांच्या पुन्हा रेशीमगाठी बांधण्याचा प्रसंग शनिवारी अचलपूर न्यायालय परिसरात महालोक अदालतीत घडला. तब्बल आठ विस्कटलेल्या जोडप्यांचे मनोमिलन करण्यात आले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा त्यांना साडी-चोळी भेट देत पुन्हा सुखी संसारासाठी उपस्थितांनी आशीर्वाद दिला.
शनिवारी अचलपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात महालोक अदालतीचे आयोजन विधी सेवा समिती आणि अचलपूर वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यामध्ये एकूण १०५ विविध प्रकरणे ठेवण्यात आली होती. दिवाणी, फौजदारी, तंटे, घरगुती वाद, नवविवाहितांच्या पारिवारिक समस्या, त्यातील मतभेदामुळे न्यायालयात दाखल प्रकरणांचा समावेश होता. शनिवारी सकाळी १०.३० वाजतापासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध प्रकरणांचा निपटारा उपस्थित न्यायाधीश, वकिलांनी यावेळी केला.
आठ जोडप्यांचे मनोमिलन
लग्नानंतर काही दिवसांतच उद्भवलेल्या पारिवारिक समस्या व भांडणामुळे विभक्त झालेल्या आठ जोडप्यांचे मनोमिलन शनिवारी अचलपूर न्यायालयात करण्यात आले. दोन्ही पक्षकारांच्या वकीलांनी यासाठी प्रयत्न केले. आपसी मतभेद, घरगुती लहानमोठी भांडणे या सर्व बाबी विसरून आठ जोडप्यांचा समेट न्यायाधीश आणि वकीलद्वयांकरवी घडवून आणला.
राज्यातील पहिला प्रयोग
अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित महालोकअदालतमध्ये आठ परिवारांचे मनोमिलन साडी-चोळी देण्याचा पहिला आगळा वेगळा कार्यक्रम राज्यात पहिला ठरला, हे विशेष. तारखेवर हजर होत न्यायालय परिसरात दुरवर बसलेल्या १६ कुटुंबांना एकत्र करून आनंदात घरी पाठविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
दोन परिवारात मनोमिलन
अचलपूर न्यायालयाचे न्यायाधीश पाटकर, हेडाऊ, शेख, जाधव, पतिंगे, चौधरी यांनी न्यायनिवाडा करताना दोन्ही परिवारांची समजूत घालीत पुन्हा सुखी संसार थाटण्याचा आशीर्वाद यावेळी दिला. मात्र न्यायाधिशासोबत त्यांच्या मनोमिलनाचे साक्षीदार बनून दुसरीकडे या आठही परिवाराला सरकारी अधिवक्ता भोला चव्हाण, नवले, विचोरे यांच्यासह खासगी अधिवक्ता सलीम, गुप्ता, शबाना, संगीता शेंडे, रवींद्र खोजरे, वाघवानी, शुल्का शर्मा, हरणे, गवई, यावले, तनपुरे, गोडबोले, अग्रवाल, संजय शेवाने यांनी साडी-चोळी भेट दिली. पुष्पगुच्छ आणि चहा-अल्पोहाराचा छोटेखानी कार्यक्रम झाला.