२५ ग्राहकांना मिळतोय महिन्याकाठी न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:08 PM2018-12-03T22:08:21+5:302018-12-03T22:08:36+5:30
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून महिन्याकाठी तब्बल २२ ते २५ ग्राहकांना न्याय दिल्या जात असून, त्यामुळेच जिल्ह्यातील ग्राहक व्यापाºयांच्या पिळवणूक व फसवणुकीतून सजग होत चालले आहे. २८ वर्षांत ग्राहक मंचाकडून ७ हजार ७३ जणांना न्याय देण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून महिन्याकाठी तब्बल २२ ते २५ ग्राहकांना न्याय दिल्या जात असून, त्यामुळेच जिल्ह्यातील ग्राहक व्यापाºयांच्या पिळवणूक व फसवणुकीतून सजग होत चालले आहे. २८ वर्षांत ग्राहक मंचाकडून ७ हजार ७३ जणांना न्याय देण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा पूर्ण करताना नागरिकांना ग्राहक बनून व्यापाऱ्यांकडून विविध प्रकारचा माल खरेदी करावा लागतो. मात्र, ग्राहक देवता म्हणून समजण्याची पद्धती तुरळक ठिकाणी पाहायला मिळते. ग्राहक हा व्यापाऱ्यासाठी देवता असतानाही अनेक व्यापारी वर्ग वस्तु विकल्यानंतर ग्राहकांना विसरून जातात. त्यातून ग्राहकांचे समाधान झाले का, याकडे व्यापारी दुर्लक्षच करताना आढळतो. ग्राहकांना वस्तू व सेवा पुरविण्याचे काम व्यापाऱ्यांचे आहे. त्यासाठी ग्राहकांना विविध अधिकार दिले असून, त्या नियमांच्या चाकोरीत बसून व्यापाऱ्यांनी ग्राहकांना वस्तु व सेवा पुरविणे आवश्यक आहे. मात्र, बरेचदा व्यापारी वर्ग ग्राहकांची पिळवणूक किंवा फसवणूक करताना आढळून येतात. बरेचसे ग्राहक व्यापाºयाच्या पिळवणुकीला बळी पडतात, तर काही तुरळकच ग्राहक न्यायासाठी झटतात. ग्राहकांनी सजग राहून आपल्या हक्कासाठी ग्राहक मंचाकडे न्यायासाठी तक्रार करणे आवश्यक असते. अमरावतीमधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने गेल्या २८ वर्षांत तब्बल ७ हजार ७३ ग्राहकांना न्याय दिला आहे.
या प्रकारातील ग्राहकांना मिळाला न्याय
ग्राहक मंचाकडून विविध प्रकारचे ग्राहक न्याय मागण्यासाठी येतात. त्यात बँक, रेल्वे, एअरलाईन्स, विमा, टेलीकॉम, पोस्टल, हाऊसिंग सोसायटी एन्ड बिल्डींग, इलेक्ट्रिसिटी, मेडिकल निग्लेजन्सी, डिफेटिव्ह हाऊसिंग होल्ड गूडस, शिक्षण, रोड ट्रान्सपोर्ट, प्रवासी वाहतूक अशा आदी ग्राहकांना ग्राहक मंचात न्याय मिळाला.
२३२ प्रकरणे प्रलंबित
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे १९९० ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत ७ हजार ३३९ ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ७ हजार ९१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. अद्याप २३२ प्रकरणे प्रलंबीत आहेत.
१८७ तक्रारी प्रलंबित
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे प्राप्त तक्रारींच्या निपटारानंतर काही विरोधी पक्ष निर्णयाचे पालन करीत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला प्रकरण दाखल करावे लागते. आतापर्यंत १८७ प्रकरणे प्रलंबित आहेत.