स्वच्छता कंत्राटदारांना २० जुलैची डेडलाइन, अन्यथा 'ब्लॅकलिस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 02:28 PM2024-07-18T14:28:58+5:302024-07-18T14:30:13+5:30

महापालिका उपायुक्त : कामकाज सांभाळताच नोटीस, कंत्राट रद्द करण्याचा दिला इशारा

July 20 deadline for sanitation contractors, otherwise 'blacklisted' | स्वच्छता कंत्राटदारांना २० जुलैची डेडलाइन, अन्यथा 'ब्लॅकलिस्ट'

July 20 deadline for sanitation contractors, otherwise 'blacklisted'

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
शहरात दैनंदिन स्वच्छतेची कामे करारनाम्यानुसार होत नसल्याने प्रभागामध्ये अस्वच्छता कायम आहे. नाल्याची साफसफाई व्यवस्थित होत नसल्याचे निरीक्षण नोंदवून आपण आपल्या कामामध्ये २० जुलैपर्यंत योग्य सुधारणा करणे बंधनकारक आहे, अशी नोटीस महापालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी मंगळवारी पाचही प्रभागातील कंत्राटदार संस्थेच्या अध्यक्ष, सचिवांना बजावली आहे.


साफसफाई होत नसल्यामुळे साथरोग, कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, असे निरीक्षणदेखील त्यांनी नोंदविले आहे. उपायुक्त प्रशासन म्हणून जबाबदारी येताच मडावी यांनी सोमवारी दुपारी स्वच्छता विभाग प्रमुखांसह अधीक्षक व निरीक्षकांची बैठक घेत स्वच्छता विभागाचा आढावा घेतला. तर मंगळवारी भर पावसात शहरातील विविध भागांची पाहणी केली. त्या पाहणीदरम्यान नोंदविलेल्या निरीक्षणाअंती त्यांनी मंगळवारी सायंकाळी पाचही झोनमधील स्वच्छता कंत्राटदारांना नोटीस बजावली. नोटीसमधील नऊ मुद्द्यांवर त्वरित कार्यवाही करावी. ती न झाल्यास आपले कंत्राट रद्द करून आपल्या संस्थेस काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.


ट्रॅक्टरने करा फवारणी
प्रभागामध्ये डास निर्मूलन मोहिमेकरिता कामगार अपुरे पडत असल्यामुळे प्रत्येक झोननिहाय पाण्याच्या टाकीसह एक नवीन ट्रॅक्टर कंत्राटदाराने खरेदी करावा व त्याद्वारे जंतुनाशक फवारणी करावी. दैनंदिन साफसफाई करण्याकरिता लावण्यात आलेल्या कामगारांना गणवेश, ओळखपत्र तसेच स्वयं सुरक्षा साहित्य किट त्वरित पुरवठा करावी व ते वापरण्यास कामगारांना बंधनकारक करावे.


१०० कामगार लावा
दैनंदिन साफसफाईकरिता झोननिहाय प्रत्येक प्रभागामध्ये १०० कामगार लावावेत. त्यांच्याकडून दैनंदिन साफसफाई, नाल्या काढणे, घराघरातून कचरा संकलित करण्यासह डास निर्मूलन मोहीम राबवावी. प्रभागातील सर्वत्र पडलेला कचरा त्वरित उचलून घ्यावा. प्रभागातील सर्व नाल्या बॉटमपासून साफ करण्यात याव्यात. प्रभागामध्ये जागोजागी पडलेल्या कचऱ्यावर तसेच नाल्यातील गाळ काढण्यात आलेल्या मलम्यावर जंतुनाशक फवारणी करण्यात यावी.


जीपीएस फोटो दररोज बंधनकारक
कामगारांची हजेरी जीपीएस फोटोने न घेतल्यास • देयक अदा करण्यात येणार नाही. प्रत्येक घरी घंटागाडीद्वारे १०० टक्के कचरा संकलन आवश्यक आहे. कामगारांची हजेरी सकाळी सहा ते ६:३० वाजेपर्यंत घेण्यात यावी. सकाळी हजेरीच्या ठिकाणी जास्त वेळ न थांबवता त्यांची हजेरी रजिस्टरमध्ये नोंद घेऊन त्यांना त्वरित कामावर पाठविण्यात यावे, असे निर्देश दिले.
 

Web Title: July 20 deadline for sanitation contractors, otherwise 'blacklisted'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.