पाच वर्षात पहिल्यांदा जुलै ‘हॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:44+5:302021-07-12T04:09:44+5:30
अमरावती : जिल्ह्यात या दशकात यंदाच्या जुलै महिन्यात पहिल्यांदा पारा ३८ अंश सेल्सिअसपुढे गेला. पावसाळ्याच्या दिवसांत अगदी भर उन्हाळ्यासारखी ...
अमरावती : जिल्ह्यात या दशकात यंदाच्या जुलै महिन्यात पहिल्यांदा पारा ३८ अंश सेल्सिअसपुढे गेला. पावसाळ्याच्या दिवसांत अगदी भर उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अंगाची काहीली करणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक घामाघूम होऊन जीव घाबरायला लागल्याची परिस्थिती जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात निर्माण झाली होती. आता दोन दिवसांपासून पावसाचे आगमन झाल्यामुळे परिस्थितीत काहीशी सुधारणा झालेली आहे.
यंदा १० जून रोजी मान्सूनचे वेळेआधी आगमन झाले व लगेच दोन दिवस सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. त्यानंतर मात्र पाऊस तुरळक प्रमाणात व विखुरत्या स्वरूपात पडला व दिवसाचे तापमानात वाढ झाल्याने नागरिक घामाघूम व्हायला लागले. घरोघरी पुन्हा कूलर सुरू करण्याची वेळ नागरिकांवर ओढवली. कृषी विभागाचे माहितीनुसार सन २०१८ मध्ये ३७ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती व त्यानंतर दरवर्षीच या तापमानाचे आत पारा राहिला आहे. यंदा तर त्यापेक्षा जास्त ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा उच्चांक आहे.
पावसाला १० जूनला सुरू झाल्यानंतर मान्सून सक्रिय झालाच नाही. तुरळक सरींनी काही वेळ वातावरणात गारवा आला व पुन्हा तापमान वाढायला सुरुवात झाली. साधारणपणे ३० जूनपर्यंत अशी परिस्थिती होती व त्यानंतर पावसाने ओढ दिल्यानंतर वातावरणात प्रचंड उकाडा वाढला.
बॉक्स
सरासरी तापमानात सहा अंशाची वाढ
बरेचदा या महिन्यात पावसामुळे जुलै महिन्यात झडसदृश स्थितीदेखील निर्माण झाली होती. यंदा मात्र सुरुवातीच्या १० दिवसांत पावसाचा ‘डॉट’ राहिला आहे. तसे पाहता ३० जूनपर्यंत कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकच तालुक्यात पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यात पाऊस कमी राहिला आहे.
बॉक्स
हा आठवडा देणार दिलासा
* हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार, यापुढील पाच दिवस सार्वत्रिक व काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होणार आहे.
* १२ ते १४ दरम्यान बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची नोंद होईल. १५ जुलैनंतर विखुरत्या पाऊस राहणार आहे.
* मान्सून सक्रिय झाल्याने पुन्हा एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत आहे व कमी-जास्त दाबाची शियर रेषा मध्य भारतावर सक्रिय आहे.
कोट
हवामानतज्ञ
यंदा मान्सून सुरुवातीला सक्रिय झालेला नसल्याने विखुरत्या स्वरूपात पाऊस पडला. दिवसाचे तापमान ३७ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचले. त्यात दमटपणा असल्याने उकाडा असह्य झालेला आहे. आता पुन्हा पावसाला सुरुवात झालेली असल्याने तापमान घटले आहे.
अनिल बंड
कोट
आरोग्य सांभाळा
जुलै महिन्यात तापमानात वाढ झाल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले. घामाच्या स्वरूपात शरीरातून पाणी निघून जात असल्याने भरपूर पाणी प्यावे. डेंग्यू, मलेरिया आजाराचे रुग्ण तपासणीत आढळत आहे. सर्वांनी आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
डॉ. मंगेश काळे
पाईंटर
असा मोडला जुलैचा रेकार्ड
२०१६ : ३४
२०१७ : ३२
२०१८ : ३७
२०१९ : ३५
२०२० : ३६
२०२१ : ३८.५