जंगलराज! मेळघाटात वाघिणीकरिता वाघाने केली छाव्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:16 PM2020-07-20T17:16:29+5:302020-07-20T17:19:44+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत चौराकुंड वनपरिक्षेत्रात शनिवारी सायंकाळी गस्तीदरम्यान जवळपास १६ महिने वयाच्या वाघाच्या मादा छाव्याचा मागच्या पायाचा तुटलेला पंजा कर्मचाऱ्यांना आढळून आला .

Jungle King! In Melghat, a tiger killed a cub | जंगलराज! मेळघाटात वाघिणीकरिता वाघाने केली छाव्याची हत्या

जंगलराज! मेळघाटात वाघिणीकरिता वाघाने केली छाव्याची हत्या

Next
ठळक मुद्देमेळघाटातील दुसरी घटनावनाधिकारांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

नरेंद्र जावरे
अमरावती : नर वाघाने आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासह वाघिणीशी समागम करण्यासाठी छाव्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत चौराकुंड परिक्षेत्रात व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या मृत मादा छाव्याचे जंगलात विखुरलेले अवयव एकत्र केले. शवविच्छेदनानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्वांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार केले.
चौराकुंड वनपरिक्षेत्रात शनिवारी सायंकाळी गस्तीदरम्यान जवळपास १६ महिने वयाच्या वाघाच्या मादा छाव्याचा मागच्या पायाचा तुटलेला पंजा कर्मचाऱ्यांना आढळून आला होता. छाव्याचे अन्य सर्व अवयव शाबूत आढळले, तर मागचा भाग खाल्लेल्या अवस्थेत होता. छाव्याचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. रविवारी पशुवैद्यकीय अधिकारी मनोज आडे, ईश्वर इंगळे यांनी शवविच्छेदन केले. त्यावेळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान संरक्षक तथा क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी, सिपना वन्यजीव विभागाच्या प्रभारी उपवनसंरक्षक पियुषा जगताप सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी निर्मळ व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.

शिकार नसल्याचा निष्कर्ष
मादा छाव्याची शिकार झाली नसून नर वाघानेच तिला संपवल्याचा प्राथमिक निष्कर्ष व्याघ्र अधिकाऱ्यांसह पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपलब्ध पुराव्यावरून काढला. वनविभागाला फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. वाघिणीशी समागमासाठी नर वाघ छाव्यांना ठार करतात. त्यात आपला वंश वाढविण्यासाठी हेतू असतो. यापूर्वी मेळघाटच्या अंबाबरवा अभयारण्यात २०१६ साली हा प्रकार उघड झाला होता. दुसरीकडे जंगलातील आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठीसुद्धा वाघ असा प्रकार करीत असल्याचे सांगण्यात आले.

वाघिणीशी समागम करण्यासाठी वाघ छाव्यांना ठार करतात. अंबाबरवा अभयारण्यात २०१६ साली हा प्रकार उघडकीस आला होता. चौराकुंड परिक्षेत्रात ही दुसरी घटना म्हणता येईल. घटनेची चौकशी सुरू आहे.
- कमलेश पाटील,
सहायक वनसंरक्षक
सिपना वन्यजीव विभाग


जंगलात अस्तित्व अबाधित ठेवण्यासह प्रतिस्पर्धी तयार होऊ नये, यासाठी वाघ नर छाव्यांना ठार करतात. मात्र, या प्रकरणात सोळा महिन्याची मादी मारण्यात आली आहे.
- जयंत वडतकर,
मानद वन्यजीव संरक्षक, अमरावती


दोन प्राण्यांची झुंज झाली. त्यातूनच वाघाच्या छाव्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फॉरेन्सिक लॅबमधून अहवाल आल्यानंतर वास्तव कळेल.
- मनोज आडे,
पशुवैद्यकीय अधिकारी, धारणी

Web Title: Jungle King! In Melghat, a tiger killed a cub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.