मेळघाटातील जंगल सफारी अवघ्या तीनच दिवसांत बंद; हजारो पर्यटकांची गर्दी, ट्रॅफिक जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 11:12 AM2021-06-28T11:12:26+5:302021-06-28T11:12:49+5:30
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावरील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटकांसाठी चालविण्यात येणारी जंगल सफारी सोमवारपासून बंद करण्यात येत आहे.
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावरील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत पर्यटकांसाठी चालविण्यात येणारी जंगल सफारी सोमवारपासून बंद करण्यात येत आहे. अप्पर प्लेटो स्थित वनउद्यानालासुद्धा टाळे लावण्यात येणार आहे. शनिवार-रविवार या दोन दिवसांत हजारो पर्यटकांनी चिखलदऱ्यात गर्दी केली. शहरातील मुख्य चौकात ट्रॅफिक जाम झाले होते.
कोरोनाचा धोका पाहता राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी नवीन आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ४ दरम्यान प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले. दुसरीकडे, मेळघाट प्रकल्पातील जंगल सफारी बंद करण्यात येत असल्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागाने स्पष्ट केले आहे.
पर्यटकांचा उत्साह मावळला
प्रधान वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी तीन दिवसांपूर्वी जंगल सफारी सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार वैराट जंगल सफारी शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस सुरू ठेवण्यात आली. सोमवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ती बंद केली जाणार असल्याचे सहायक वनसंरक्षक राजकुमार पटवारी यांनी सांगितले. त्यामुळे खास पावसाळ्यात मेळघाटात येणाऱ्या पर्यटकांचा उत्साह मावळला आहे.
हजारो पर्यटकांची गर्दी
चिखलदरा पर्यटन स्थळावर शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस १२ हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली होती. प्रत्येक पॉईंटवर दुचाकी, चारचाकी व मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरातील वनउद्यान चौक व बाजारातील चौकात ट्रॅफिक जाम झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
कोरोना नियमांचे पालन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गुगामल वन्यजीव विभागातील जंगल सफारी सोमवारपासून बंद करण्यात येत आहे. वन उद्यानसुद्धा बंद राहील.
राजकुमार पटवारी, सहायक वनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा