मेळघाटात जंगल सफारी वांध्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 02:17 PM2020-06-24T14:17:38+5:302020-06-24T14:26:07+5:30
राज्यात उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प हे पर्यटकांसाठी हल्ली बंद आहेत. त्यामुळे मेळघाटातील जंगल सफारी सुरू करण्याच्या आदेशाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात १९ जूनपासून जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळघाटात अन्य पर्यटकांना मनाई असताना, जंगल सफारी कशी सुरू झाली, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यात उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प हे पर्यटकांसाठी हल्ली बंद आहेत. त्यामुळे मेळघाटातील जंगल सफारी सुरू करण्याच्या आदेशाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांची स्वाक्षरी असलेल्या आदेशाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह ज्ञानगंगा, काटेपूर्णा, लोणार व टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यही पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. कोरोनाचे संकट कायम असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी सुरू झाल्याबाबत पर्यावरणप्रेमी, वन्यजीव संरक्षकांमध्ये कमालीचा रोष पाहावयास मिळत आहे. तसेही पावसाळा सुरू असताना व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी बंद असते. राज्य शासनाने पर्यटनस्थळे, व्याघ्र प्रकल्प, अभयारण्ये सुरू करण्याबाबत कोणतेही गाइड लाइन जारी केले नाही. असे असताना कशाच्या आधारे रेड्डी यांनी मेळघाटात जंगल सफारी सुरू केली, हा मोठा गंभीर विषय पुढे आला आहे.
केवळ जंगल सफारीला मान्यता देण्यात आली असून, पर्यटकांसाठी हॉटेल, रेस्टारंट बंद आहेत. मेळघाटात जंगल सफारी सुरू करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेण्यात आली नाही, असा आक्षेपदेखील पर्यावरणप्रेमींनी घेतला आहे. राज्यात जंगल सफारीचे बूकिंग ऑनलाईन असताना मेळघाटात ऑफलाईन का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे जंगल सफारी येत्या काळात वांध्यात तर येणार नाही, असे बोलले जात आहे.
व्याघ्र प्रक ल्प संवर्धन आणि मॅनेजमेंट प्लॅनमध्ये पर्यटनाबाबत काही बाबी स्पष्टपणे नमूद आहेत. त्यामुळे जंगल सफारी सुरू करताना वेगळे आदेश काढण्याची गरज नाही. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अहवालानुसार पर्यटन सुरू करण्यात आले.
- नितीन काकोडकर,
प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर.
चिखलदऱ्यात जंगल सफारीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पर्यटकांना प्रवेश नाही. व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यापूर्वी नाक्यावर वनकर्मचारी तैनात आहेत. पर्यटकांची तपासणी करूनच वाहने सोडले जाते. हॉटेल, रेस्टारंट बंद असून, पर्यटकांनासाठी निवासाची व्यवस्था नाही.
- सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी, चिखलदरा.